न्यूझीलंड-श्रीलंका कसोटी मालिका
कोलंबोमधील दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने श्रीलंकेवर एक डाव आणि ६५ धावांनी शानदार विजय मिळवत दोन कसोटी सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली.
न्यूझीलंडने ६ बाद ४३१ धावांवर आपला डाव घोषित केल्यानंतर यष्टिरक्षक-फलंदाज निरोशात डिक्वेलाने झुंजार फलंदाजीचा प्रत्यय घडवला. त्याने तीन तास खेळपट्टीवर ठाण मांडून ५१ धावांची खेळी साकारली. श्रीलंकेचा बाद झालेला तो नववा फलंदाज ठरला. त्याला बाद करण्यात यश मिळताच न्यूझीलंडने सामन्यावर नियंत्रण मिळवले.
मग पाचव्या दिवसाचा खेळ संपण्यास एक तास शिल्लक असताना ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर लसिथ ईम्बुलडेनियाचा केन विल्यम्सनने अप्रतिम झेल टिपला आणि श्रीलंकेचा दुसरा डाव १२२ धावांवर संपुष्टात आला. न्यूझीलंडकडून अजाझ पटेल, टिम साऊदी, बोल्ट आणि विल्यम सॉमरव्हिले यांनी प्रत्येकी बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक
श्रीलंका (पहिला डाव) : २४४
न्यूझीलंड (पहिला डाव) : ६ बाद ४३१ डाव घोषित
श्रीलंका (दुसरा डाव) : ७०.२ षटकांत सर्व बाद १२२ (निरोशान डिक्वेला ५१; टिम साऊदी २/१५)
सामनावीर : टॉम लॅथम.