न्यूझीलंडविरुद्ध भारतीय महिला संघाने सलग दुसरा पराभव पत्करला. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने सहा विकेट्स राखून विजय मिळवला. त्यामुळे पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत आता भारतीय संघ १-२ असा पिछाडीवर पडला आहे.
एम. चिन्नास्वामी स्टेडियमवरील सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ९ बाद १८२ धावा केल्या. वेदा कृष्णमूर्तीने (६१) सर्वाधिक धावा केल्या. हे आव्हान किवी संघाने ४५.४ षटकांत आरामात पेलले. सोफी डीव्हाइनने ४० धावांत ३ बळी घेतले. सलामीवीर सुझी बेट्स (५९) आणि रॅचेल प्रीस्ट (६४) यांनी १२५ धावांची महत्त्वाची भागीदारी रचून न्यूझीलंडच्या विजयाची पायाभरणी केली. आता आणखी एक विजय मिळवल्यास न्यूझीलंड भारतामध्ये पहिलावहिला मालिकाविजय प्राप्त करू शकेल. हा विजय साकारल्यास किवी संघ आयसीसी मालिकेत पाचव्या स्थानावर पोहोचू शकेल.

संक्षिप्त धावफलक
भारत : ५० षटकांत ९ बाद १८२ (वेदा कृष्णमूर्ती ६१; सोफी डीव्हाइन ३/४०) पराभूत वि. न्यूझीलंड : ४५.४ षटकांत ४ बाद १८६ (रॅचेल प्रीस्ट ६४, सुझी बेट्स ५९; झुलन गोस्वामी १/२८)

Story img Loader