नवीन वर्ष हे नवीन ध्येय, नवीन आशा, नवीन अपेक्षा, नवीन स्वप्न घेऊन येत असते. विक्रम हे मोडण्यासाठीच असतात आणि याचाच प्रत्यय नवीन वर्षांच्या पहिल्याच दिवशी अनुभवायला मिळाला. नवीन वर्षांच्या पहिल्याच दिवशी विक्रम अनुभवायला मिळाल्याने आता आगामी वर्षांत आणखी कोणते पराक्रम क्रिकेटरसिकांना पाहायला मिळणार, याची उत्सुकता ताणली गेली आहे. न्यूझीलंडचा अष्टपैलू कोरे अँडरसनने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना आपल्या वादळी खेळीपुढे लोटांगण घालायला लावत एक नवा इतिहास रचला. अँडरसनने फक्त ३६ चेंडूंमध्ये शतक झळकावत पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीचा जलद शतकाचा विक्रम मोडीत काढला. त्याच्या या धडाकेबाज शतकाच्या जोरावर न्यूझीलंडने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजवर १५९ धावांनी दणदणीत विजय मिळवला.
प्रथम फलंदाजी करताना ४६ चेंडूंत शतक झळकावत जेसी रायडरने वेस्ट इंडिजचा समाचार घ्यायला सुरुवात केलीच होती. त्याने ५१ चेंडूंत १२ चौकार आणि ४ षटकारांच्या जोरावर १०४ धावांची खेळी साकारली. पण त्याच वेळी त्याची ही खेळी बचावात्मक वाटावी, अशी खेळी अँडरसनने साकारली. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना स्टेडियमचा प्रत्येक कोपरा दाखवत अँडरसनने त्यांची पिसे काढत फक्त ३६ धावांमध्ये शतक साकारण्याची किमया साधली. यापूर्वी श्रीलंकेविरुद्ध खेळताना आफ्रिदीने ३७ चेंडूमध्ये शतक झळकावले होते. अँडरसनने या वेळी ६ चौकार आणि तब्बल १४ षटकारांची आतषबाजी करत ४७ चेंडूंत नाबाद १३१ धावांची खेळी साकारली. त्याचे हे धडाकेबाज शतक आणि रायडरबरोबर चौथ्या विकेटसाठी रचलेल्या १९१ धावांच्या जोरावर न्यूझीलंडने २१ षटकांत ४ बाद २८३ असा धावांचा डोंगर रचला. या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजला २१ षटकांमध्ये १२४ धावाच करता आल्या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा