Jacob Duffy replace Ben Sears for New Zealand Champions Trophy 2025 squad : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ सुरू होण्यास आता काही दिवसच शिल्लक आहेत, पण त्याआधी संघ आपल्या अधिकृत पथकांमध्ये काही बदल करताना दिसून येत आहेत, ज्यामध्ये आता न्यूझीलंड संघातील एका नावाचाही समावेश करण्यात आला आहे. किवी संघाला स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच वेगवान गोलंदाज बेन सीयर्सच्या रूपाने मोठा धक्का बसला आहे. हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे तो संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला आहे. न्यूझीलंड क्रिकेटने बेनच्या जागी बदली खेळाडूचे नाव जाहीर केले आहे.
बेन सियर्सच्या जागी जेकब डफी संघात सामील –
किवी संघ नुकताच पाकिस्तानमध्ये पोहोचला आहे, जिथे तो चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी तिरंगी मालिकेत खेळत आहे. न्यूझीलंड क्रिकेटने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात असे म्हटले आहे की कराचीमध्ये सराव करताना हॅमस्ट्रिंगची दुखापतीनंतर बेन सियर्सचे स्कॅन करण्यात आले होते. त्यानंतर आता त्याला किमान २ आठवडे मैदानाबाहेर राहावे लागेल. अशा परिस्थितीत, आम्ही सध्या सुरू असलेल्या तिरंगी मालिकेत किवी संघाचा भाग असलेल्या सीयर्सच्या जागी ओटागो व्होल्ट्सचा वेगवान गोलंदाज जेकब डफीचा चॅम्पियन्स ट्रॉफी संघात समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
किवी संघाचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी बेन सीयर्सच्या वगळण्याबद्दल निराशा व्यक्त केली आणि सांगितले की स्पर्धेपूर्वी दुखापतीमुळे बाहेर पडणे खूप निराशाजनक आहे. बेनच्या कारकिर्दीतील ही पहिली आयसीसी स्पर्धा ठरली असती, पण आता तो बाहेर पडला आहे.
रचिन रवींद्र आणि फर्ग्युसन यांच्या फिटनेसवरही लक्ष –
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी किवी संघाच्या संघात आणखी काही बदल होऊ शकतात, ज्यामध्ये सर्वांच्या नजरा रचिन रवींद्र आणि लॉकी फर्ग्युसन यांच्या तंदुरुस्तीवरही आहेत. तिरंगी मालिकेतील पहिल्या सामन्यात चेंडू पकडताना रचिनच्या कपाळावर चेंडू लागला होता, त्यानंतर तो मैदानाबाहेर जात आहे. दरम्यान, फर्ग्युसन त्याच्या हॅमस्ट्रिंग दुखापतीतून अद्याप पूर्णपणे बरा झालेला नाही.
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी न्यूझीलंडचा संघ:
मिचेल सँटनर (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिचेल, विल ओ’रोर्क, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, जेकब डफी, नॅथन स्मिथ, केन विल्यमसन, विल यंग.