पहिल्या टप्प्यातील निराशाजनक कामगिरी मागे सारून जेतेपदासाठी दावेदार समजल्या जाणाऱ्या मँचेस्टर सिटीने धूम ठोकत इंग्लिश प्रीमिअर लीग फुटबॉल स्पर्धेच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी मजल मारली आहे. मँचेस्टर सिटीने रविवारी रात्री झालेल्या सामन्यात न्यूकॅसल युनायटेडचा २-० असा पराभव करत ४७ गुणांसह अग्रस्थान राखले आहे. लुइस सुआरेझच्या दोन गोलांच्या बळावर लिव्हपरूलने स्टोक सिटीवर ५-३ असा विजय मिळवला.
इडिन झेको (आठव्या मिनिटाला) आणि अल्वारो नेग्रेडो (९०व्या मिनिटाला) यांनी गोल करत मँचेस्टर सिटीच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. पहिल्या सत्रात न्यूकॅसलची बरोबरी साधण्याची संधी होती. पण चेईक टोईटे याने लगावलेला गोल पंचांनी ‘ऑफसाईड’ ठरवला. पंच माईक जोन्स यांच्या या वादग्रस्त निर्णयानंतर निराश झालेल्या चाहत्यांनी आणि न्यूकॅसलचे प्रशिक्षक अॅलन पारडेव यांनी मैदान सोडले. मँचेस्टर सिटीचा हा सलग सहावा विजय ठरला. सोमवारी झालेल्या सामन्यात अर्सेनलला अॅस्टन व्हिलाकडून पराभूत व्हावे लागले तरच मँचेस्टर सिटीचे अव्वल स्थान कायम राहणार आहे.
लिव्हरपूलने स्टोक सिटीवर विजय मिळवून गुणतालिकेत चौथे स्थान पटकावले आहे. रायन शॉक्रॉसच्या स्वयंगोलमुळे लिव्हरपूलला आघाडी मिळाली. त्यानंतर सुआरेझच्या गोलमुळे लिव्हरपूलने ही आघाडी २-० अशी वाढवली. मात्र पीटर क्राऊच आणि चार्ली अॅडम यांनी गोल करत पहिल्या सत्राअखेरीस स्टोक सिटीला २-२ अशी बरोबरी मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात स्टीव्हन गेरार्ड, सुआरेझ यांनी प्रत्येकी एक गोलाची भर घातली. जोनाथन वॉल्टर्सने स्टोक सिटीसाठी तिसरा गोल केला. सामना संपायला तीन मिनिटे शिल्लक असताना डॅनियल स्टरिजने पाचवा गोल करत लिव्हरपूलच्या विजयावर मोहोर उमटवली.
रिअल माद्रिदची आगेकूच
बार्सिलोना आणि अॅटलोटिको माद्रिद या दोन संघांमधील सामना गोलशून्य बरोबरीत सुटल्याचा फायदा रिअल माद्रिदने उचलला. रिअल माद्रिदने स्पॅनिश लीग फुटबॉल स्पर्धेत इस्पान्योल संघावर १-० अशी मात केली. आता अव्वल स्थानावरील बार्सिलोना आणि अॅटलेटिको माद्रिद (प्रत्येकी ५० गुण) यांच्यापेक्षा रिअल माद्रिद (४७ गुण) फक्त तीन गुणांनी मागे आहे. पोर्तुगालचा पेपे याचा गोल रिअल माद्रिदच्या विजयात निर्णायक ठरला.
मँचेस्टर सिटीची धूम
पहिल्या टप्प्यातील निराशाजनक कामगिरी मागे सारून जेतेपदासाठी दावेदार समजल्या जाणाऱ्या मँचेस्टर सिटीने धूम ठोकत इंग्लिश प्रीमिअर लीग फुटबॉल स्पर्धेच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी मजल मारली आहे.
First published on: 14-01-2014 at 01:32 IST
TOPICSइंग्लिश प्रीमियर लीग
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Newcastle 0 2 manchester city pellegrini on pardew row