क्रिकेटपटूंवर ट्वेन्टी-२० लढतींचा इतका प्रभाव पडला आहे की, कसोटीतही ते त्याच नशेत खेळतात असा प्रत्यय येथे पाहावयास मिळाला. व्हर्नान फिलँडर याने सात धावांमध्ये घेतलेल्या पाच बळींमुळेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या क्रिकेट कसोटीत न्यूझीलंडचा पहिल्या डावात १९.२ षटकांत ४५ धावांत खुर्दा उडाला.
न्यूझीलंडच्या फलंदाजांनी आफ्रिकेच्या प्रभावी माऱ्यापुढे सपशेल नांगी टाकली. आफ्रिकेचा द्रुतगती गोलंदाज फिलँडर याने सहा षटकांमध्ये केवळ सात धावा देत न्यूझीलंडचा निम्मा संघ तंबूत धाडला. डेल स्टेन (२/१८) व मोर्न मोर्कल (३/१४) यांनी त्याला चांगली साथ दिली. न्यूझीलंडचे पहिले पाचही बळी फिलँडरने घेतले त्यावेळी त्याने ४.१ षटकांत केवळ चार धावा दिल्या होत्या. न्यूझीलंडकडून केन विल्यमसन हा एकच फलंदाज दोन आकडी धावा करू शकला. त्याने १३ धावा केल्या. न्यूझीलंडचा कर्णधार ब्रॅन्डन मॅककुलम याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली होती. त्याचा हा निर्णय चांगलाच अंगलटी आला.
न्यूझीलंडची सर्वबाद ४५ धावा ही या मैदानावरील गेल्या शंभर वर्षांमधील नीचांकी धावसंख्या आहे. नोव्हेंबर २०११ मध्ये ऑस्ट्रेलियाचा डाव ४७ धावांमध्ये कोसळला होता.
आफ्रिकेची सुरुवात निराशाजनक झाली. त्यांचा कर्णधार ग्रॅमी स्मिथ हा केवळ एक धाव काढून तंबूत परतला. मात्र त्यानंतर हाशिम अमला व अल्वीरो पीटरसन यांनी दुसऱ्या विकेटसाठी १०७ धावांची भागीदारी करीत डाव सावरला. अमला याने अर्धशतक पूर्ण केले मात्र त्यानंतर तो फार वेळ टिकला नाही. ६६ धावांवर तो बाद झाला. त्यामध्ये त्याने नऊ वेळा चेंडू सीमापार केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा