ऑलिम्पिक पात्रता पूर्ण केल्यामुळे माझे मनोधैर्य उंचावले आहे. या स्पर्धेसाठी अजून बराच कालावधी आहे. त्याचा फायदा घेत ऑलिम्पिक पदक मिळविण्यासाठी मी खूप मेहनत घेणार आहे, असे भारताची जिम्नॅस्ट दीपा कर्माकरने येथे सांगितले.
दीपा या २२ वर्षीय खेळाडूने ५२.६९८ गुण मिळवित कलात्मक जिम्नॅस्टिक्स या क्रीडा प्रकारात ऑलिम्पिकचे तिकीट निश्चित केले. तिने व्हॉल्ट या प्रकारात १४.८३३ गुण नोंदवित सोनेरी कामगिरी केली. तिने २००८ ची ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती ओक्साना चुसोवितिना (उजबेकिस्तान) हिच्यावर मात केली. जिम्नॅस्टिक्समध्ये ऑलिम्पिक पात्रता पूर्ण केलेली दीपा ही पहिली भारतीय महिला खेळाडू आहे. १९६४ च्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या सहा खेळाडूंनी जिम्नॅस्टिक्समध्ये प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर प्रथमच भारतीय खेळाडूला जिम्नॅस्टिक्समध्ये प्रवेश मिळाला आहे.
दीपाने सांगितले, ‘ऑलिम्पिक प्रवेश हा माझ्यासाठी सुवर्णपदक जिंकल्याचाच अनुभव आहे. अर्थात आता माझी खरी कसोटी आहे. ऑलिम्पिक पदक मिळविण्यासाठी जगातील अनेक अव्वल दर्जाच्या खेळाडूंशी मला झुंज द्यावी लागणार आहे. मात्र मेहनत व जिद्द याच्या जोरावर ऑलिम्पिक पदकाचे स्वप्न मी साकार करेन अशी मला खात्री आहे.’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा