ब्राझील न्यायालयाचे आदेश; खाजगी नौका आणि विमानही जप्त
बार्सिलोना आणि ब्राझ१लचा अव्वल फुटबॉलपटू नेयमारच्या संपत्तीवर ब्राझील न्यायालयाने टाच आणली आहे. यामध्ये त्याची खासगी नौका आणि विमान असा एकूण ५० कोटी अमेरिकन डॉलर संपत्तीचा समावेश आहे.
कर चुकविल्याप्रकरणी दोषी आढळलेल्या नेयमारने दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली आणि त्याची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिल्याची माहिती स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिली आहे. स्थानिक क्लब सँटोसमधून २०११ ते २०१३ या कालावधीत खेळताना जवळपास १६ कोटी अमेरिकन डॉलर कर चुकवल्यामुळे नेयमार व त्याच्या कुटुंबाला दोषी ठरविण्यात आले होते. याविरोधात त्याने याचिका दाखल केली होती. थकित कर चुकवल्यास नेयमारचे तुरुंगात जाणे टळू शकते, अशी माहिती फेडरल कर संस्थेचे लेखापरीक्षक लॅगरो जंग मार्टिन यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘या निर्णयाविरोधात नेयमार दाद मागू शकतो, परंतु ती पुढची प्रक्रिया आहे. गेल्या वर्षांप्रमाणेच परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. थकीत कर चुकवल्यास हा खटला बंद होईल.’’
बार्सिलोना क्लबसोबत झालेल्या कराराची रक्कम लपवल्याप्रकरणी २ फेब्रुवारीला नेयमार आणि त्याच्या वडीलांची माद्रिद न्यायालयात तीन तास चौकशी करण्यात आली होती. बार्सिलोनाने नेयमारसाठी ७४ कोटी अमेरिकन डॉलर मोजले होते, परंतु प्रत्यक्षात सँटोस क्लबला त्यांनी केवळ १८.५ कोटी अमेरिकन डॉलरच दिले.
उर्वरित ४० टक्के रक्कम (५५.५ कोटी डॉलर) ही नेयमारच्या वडीलांच्या कंपनीच्या खात्यात वळविण्यात आली. मात्र स्पेनच्या तपासयंत्रणेने केलेल्या तपासात बार्सिलोनाने जवळपास ९० कोटी अमेरिकन डॉलरचा करार केल्याचे समोर आले.

Story img Loader