काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे पडघम आता दिसू लागले आहेत. फिफा विश्वचषक स्पर्धेला ९९ दिवस शिल्लक राहिले असून बुधवारी रात्री झालेल्या आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण फुटबॉल सामन्यांमध्ये प्रत्येक संघाचा आपण विश्वचषकासाठी सज्ज असल्याचा प्रयत्न सुरू होता. फिफा विश्वचषकाचे संयोजनपद सांभाळणाऱ्या ब्राझीलने नेयमारच्या हॅट्ट्रिकच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेचा ५-० असा धुव्वा उडवला. मात्र लिओनेल मेस्सीच्या आजारपणामुळे अर्जेटिनाला रोमानियाविरुद्ध गोलशून्य बरोबरीला सामोरे जावे लागले.
फिफा विश्वचषकासाठी संघात स्थान मिळवण्याकरिता ब्राझीलच्या खेळाडूंसाठी ही शेवटची संधी होती. नेयमारने अपेक्षेप्रमाणे आपली छाप पाडली. ऑस्करने १०व्या मिनिटाला ब्राझीलचे खाते खोलल्यानंतर नेयमारने पहिल्या सत्रात एक आणि दुसऱ्या सत्रात दोन गोल झळकावत हॅट्ट्रिक साजरी केली. त्यानंतर फर्नाडिन्होने गोल करत ब्राझीलच्या विजयावर मोहोर उमटवली. दक्षिण आफ्रिकेला ब्राझीलविरुद्ध मात्र चमकदार कामगिरी करता आली नाही.
विश्वचषकाचा दावेदार अर्जेटिनाला साजेसा खेळ करता आला नाही. आजारपणामुळे अशक्त वाटणाऱ्या मेस्सीचे गोलसाठीचे प्रयत्न रोमानियाच्या बचावपटूंनी हाणून पाडल्यामुळे हा सामना गोलशून्य बरोबरीत सुटला.
ख्रिस्तियानो रोनाल्डोने केलेल्या दोन गोल्सच्या बळावर पोर्तुगालने दुबळ्या कॅमेरूनचा ५-१ असा दणदणीत पराभव केला. या कामगिरीसह रोनाल्डो हा पोर्तुगालचा सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरला आहे. रोनाल्डोने पौलेटाचा विक्रम मागे टाकत आपली गोलसंख्या ४९वर नेली आहे.
बलाढय़ इंग्लंडला मात्र विजयासाठी संघर्ष करावा लागला. डॅनियल स्टरिजने ८२व्या मिनिटाला हेडरवर केलेल्या गोलमुळे इंग्लंडने डेन्मार्कवर १-० असा निसटता विजय मिळवला. स्पेन व इटली या दोन तगडय़ा देशांमधील लढत स्पेनने १-० अशी जिंकली. प्रेडोने ६३व्या मिनिटाला केलेला गोल निर्णायक ठरला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा