अल रायन : गतउपविजेत्या क्रोएशियाकडून पेनल्टी शूटउटमध्ये पराभव पत्करावा लागल्याने ब्राझीलचे विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. ब्राझीलचा तारांकित आघाडीपटू नेयमारने या सामन्यादरम्यान ब्राझीलकडून सर्वाधिक गोल करण्याच्या पेले यांच्या विक्रमाशी बरोबरी साधली. मात्र, अखेरीस त्याच्या पदरी निराशाच पडली. त्याचे विश्वविजेतेपदाचे स्वप्न अधुरेच राहिले. त्यामुळे त्याला मैदानाबाहेर जाताना अश्रू अनावर झाले.
नियमित वेळेतील गोलशून्य बरोबरीनंतर अतिरिक्त वेळेत नेयमारने गोल करत ब्राझीलला आघाडी मिळवून दिली होती. ब्राझीलसाठी नेयमारचा हा ७७वा गोल ठरला. त्यामुळे त्याने दिग्गज फुटबॉलपटू पेले यांच्या विक्रमाशी बरोबरी साधली. मात्र, त्याला ब्राझीलला विजय मिळवून देता आला नाही. अतिरिक्त वेळेतील १-१ अशा बरोबरीनंतर झालेल्या पेनल्टी शूटआउटमध्ये ब्राझीलला २-४ असा पराभव पत्करावा लागला. नेयमारला पेनल्टी मारण्याची संधीही मिळाली नाही. या पराभवानंतर नेयमारने राष्ट्रीय संघासोबतच्या भविष्याबाबत भाष्य करणे टाळले.
पेले यांच्याकडून अभिनंदन
ब्राझीलसाठी सर्वाधिक गोलच्या विक्रमाशी बरोबरी केल्यानंतर नेयमारचे पेले यांनी अभिनंदन केले. ‘‘मी तुला लहानाचा मोठा होताना पाहिले आहे. मी कायम तुला प्रोत्साहन दिले आणि आज तू ब्राझीलसाठी सर्वाधिक गोलच्या माझ्या विक्रमाशी बरोबरी करून तुझे अभिनंदन करण्याची मला संधी दिली आहेस. मी ५० वर्षांपूर्वी विक्रम रचला होता. त्यानंतर कोणालाही या विक्रमापर्यंत पोहोचता आले नव्हते. तुझे यश किती मोठे आहे हे यावरून कळते,’’ असे पेले यांनी इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये लिहिले.