विश्वचषक स्पध्रेत यजमान ब्राझीलसाठी २२ वर्षीय नेयमार हा हुकमी एक्का मानला जातो आहे. चित्तथरारक पद्धतीने गोलवर नियंत्रण मिळवत सातत्याने गोल करण्याची त्याची क्षमता अद्भुत आहे. मैदानावर धडाकेबाज कामगिरी करत असताना फॅशनच्या दुनियेतही नवेनवे प्रयोग करण्यात तो आघाडीवर आहे. अजब केशरचना करण्यातसुद्धा नेयमार पटाईत आहे. एखाद्या मोठय़ा स्पर्धेदरम्यानही त्याचे हे केशप्रयोग सुरूच असतात. या सगळ्याला वेळ देऊनही त्याच्या कामगिरीवर कोणताही परिणाम होत नाही हे विशेष.
ब्राझीलच्या सलामीच्या लढतीत दोन गोल करत नेयमारने विजयात निर्णायक भूमिका बजावली. या सामन्यात त्याच्या केसांची रचना सामान्य अशी होती. मात्र मेक्सिकोविरुद्धच्या लढतीत सोनेरी केसांचा नेयमार चाहत्यांना पाहायला मिळाला. दोन्ही बाजूंना केस पूर्ण केलेले आणि मध्यभागी सोनेरी रंगाचा केसांचा पुंजका राखलेला. विचित्र वाटेल परंतु आकर्षित करेल अशा केशप्रयोगासह नेयमार मेक्सिकोविरुद्ध मैदानात उतरला, मात्र हा प्रयोग नेयमार आणि ब्राझीलसाठी यशस्वी ठरला नाही.

Story img Loader