ब्राझील आणि इटली या बलाढय़ संघांनी अपेक्षेप्रमाणे सुरेख कामगिरी करत ‘अ’ गटातून कॉन्फेडरेशन चषकाची उपांत्य फेरी गाठली आहे. नेयमारच्या अप्रतिम कामगिरीच्या जोरावर ब्राझीलने मेक्सिकोचे आव्हान २-० असे सहजपणे परतवून लावत सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. इटलीने पिछाडीवरून मुसंडी मारत जपानचा निसटता पराभव करून आगेकूच केली.
मेक्सिकोच्या बचाव फळीला ब्राझीलचे प्रमुख अस्त्र नेयमारला रोखण्यात अपयश आले. एक गोल करून दुसऱ्या गोलसाठी मोलाचा वाटा उचलणारा नेयमार ब्राझीलच्या विजयाचा शिल्पकार ठरला. पहिल्या सत्रात ०-२ असे पिछाडीवर पडल्यामुळे इटलीवर पराभवाचे संकट उभे राहिले होते. पण ११ मिनिटांत तीन गोल करून सामन्यात मुसंडी मारली आणि सेबॅस्टियन गियोविन्कोच्या निर्णायक गोलमुळे इटलीने जपानचा ४-३ असा पराभव केला.  
आशियाई चषक विजेत्या जपानने कैसुके होन्डा (२१व्या मिनिटाला) आणि शिंजी कागावा (३३व्या मिनिटाला) यांच्या गोलाच्या बळावर मध्यंतराला २-० अशी मजबूत आघाडी घेतली होती. डॅनियल डे रोस्सीने (४१व्या मिनिटाला) गोल करून पिछाडी भरून काढण्याचा प्रयत्न केला. अत्सुतो उचिडा (५०व्या मिनिटाला) आणि मारियो बालोटेल्ली (५२व्या मिनिटाला) यांनी तीन मिनिटांच्या फरकाने दोन गोल करत इटलीला ३-२ असे आघाडीवर आणले. जपानच्या शिंजी ओकाझाकी याने ६९व्या मिनिटाला बरोबरी साधली. सामना संपायला चार मिनिटे शिल्लक असताना गियोविन्कोने केलेल्या गोलमुळे अखेर इटलीने विजय साकारला.
दानी अल्वेसने मेक्सिकोच्या बचावपटूंना भेदत गोलक्षेत्रात चेंडू नेयमारकडे सोपवला. नेयमारने हेडरद्वारे मेक्सिकोचा गोलरक्षक जोस कोरोना याला चकवत नवव्या मिनिटाला ब्राझीलसाठी पहिला गोल झळकावला. ब्राझीलतर्फे गेल्या १५ सामन्यांतील नेयमारचा हा १३वा गोल ठरला. १२व्या मिनिटाला कोरोनाने अल्वेसचा प्रयत्न हाणून पाडला. त्यानंतर सामना संपेपर्यंतच्या खेळावर ब्राझीलचे नियंत्रण होते. अतिरिक्त वेळेत नेयमारच्या सुरेख कामगिरीवर जो याने गोल करून ब्राझीलच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा