फिफातर्फे देण्यात येणाऱ्या वर्षांतील सवरेत्कृष्ट फुटबॉलपटूसाठी देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या बलून डी ओर पुरस्कारासाठी लिओनेल मेस्सी, गॅरेथ बॅले, रिबरी, नेयमार यांच्यासह २३ जणांची शिफारस करण्यात आली आहे.
युइफातर्फे देण्यात येणाऱ्या युरोपातील सवरेत्कृष्ट फुटबॉलपटूचा मान रिबरीने मिळवला होता. रिबरीच्या शानदार खेळाच्या जोरावर बायर्न म्युनिचने चॅम्पियन्स लीग स्पर्धेच्या जेतेपदावर कब्जा केला होता. जर्मन चषकाचे जेतेपद मिळवून देण्यातही रिबरीचा खेळ निर्णायक ठरला होता.
लिओनेल मेस्सीने शेवटच्या चार वर्षांमध्ये या पुरस्कारावर नाव कोरले होते. प्रशिक्षक, संघांचे कर्णधार, प्रसारमाध्यमे यांच्यातर्फे मतदान होऊन विजेत्याची निवड करण्यात येते. हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात मेस्सी दुखापतग्रस्त झाला होता. त्याच्या अनुपस्थितीमुळेच चॅम्पियन्स लीग स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या लढतीत बार्सिलोनाचा संघ बायर्न म्युनिचकडून पराभूत झाला होता.
सँटोस क्लबकडून बार्सिलोनाच्या ताफ्यात दाखल झालेल्या ब्राझिलचा नेयमारही पुरस्कारासाठी प्रबळ दावेदार आहे. दुसरीकडे श्रीमंत फुटबॉलपटूचा मान मिळवलेला गॅरेथ बॅलेही पुरस्कारासाठी शर्यतीत आहे. लिव्हरपूलचा आघाडीपटू ल्युईस सुआरेझचे नावही चर्चेत आहे. पुढील वर्षी १३ जानेवारीला पुरस्काराची घोषणा होणार आहे. सवरेत्कृष्ट प्रशिक्षकासाठी अ‍ॅलेक्स फग्र्युसन आणि ज्युप हेनेक्स हे निवृत्त प्रशिक्षक रिंगणात आहेत.