पाच वेळा विश्वविजेत्याचा मान पटकावणाऱ्या ब्राझील संघाला कोपा अमेरिका फुटबॉल स्पध्रेच्या पहिल्याच लढतीत जागतिक क्रमवारीत ६१व्या स्थानावर असलेल्या पेरू संघाने विजयासाठी झुंजवले. सामना संपण्याच्या अगदी शेवटच्या मिनिटापर्यंत ही लढत १-१ अशा बरोबरीत सुटेल आणि ब्राझीलला एका गुणावरच समाधान मानावे लागेल अशी चिन्हे होती. मात्र, कर्णधार नेयमारने ९०व्या मिनिटाला पेरूच्या चार खेळाडूंना चकवून अगदी चतुराईने चेंडू डोउग्लास कोस्टा याच्याकडे टोलवला. पुढील जबाबदारी कोस्टाने अचूकपणे पार पाडत ब्राझीलच्या विजयावर २-१ अशी मोहोर उमटवली.
जागितक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेल्या ब्राझीलला लढतीपूर्वीच विजयाचे प्रमुख दावेदार मानले होते. परंतु, तुलनेने कमकुवत असलेल्या पेरूचा खेळ पाहून मतपरिवर्तन झाले. सामन्याच्या तिसऱ्याच मिनिटाला ख्रिस्टियान क्युवास याने तणावाखालीही अप्रतिम खेळ करताना ब्राझीलची बचावफळी तोडून पेरूसाठी पहिला गोल नोंदविला. हा आनंद त्यांना फार काळ साजरा करता आला नाही. पुढच्याच मिनिटाला डॅनिस अल्वेस याने कॉर्नरवरून टोलावलेला चेंडू नेयमारने हेडरद्वारे गोलजाळीत टाकला आणि सामना १-१ असा बरोबरीत आणला. या बरोबरीचे कोणतेही दडपण न घेता पेरूच्या खेळाडूंनी आक्रमक पवित्रा वापरत सामन्यावर पकड घेतली होती. त्यामुळे अगदी शेवटपर्यंत सामना बरोबरीत सुटेल असेच चित्र होते, परंतु यंदाच्या सत्रात धमाकेदार कामगिरी करणाऱ्या नेयमारने पेरूच्या बचावपटूंना चकवा देत चेंडू जास्तीत जास्त काळ स्वत:कडे ठेवून गोल करण्याचा प्रयत्न केला. त्याला कोस्टाकडून योग्य साथ मिळाली आणि ब्राझीलने ओढावणारी नामुष्की दूर केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा