जबरदस्त फॉर्मात असलेल्या नेयमारच्या दमदार प्रदर्शनाच्या जोरावर बार्सिलोनाने कोपा डेल रे फुटबॉल स्पर्धेत कार्टाजेना संघावर ३-० असा विजय मिळवला. त्यामुळे ७-१ अशा सरासरी विजयासह बार्सिलोनाने पुढील फेरीत आगेकूच केली.
संथ सुरुवातीनंतर कार्टाजेनाच्या दिएगो सेग्युराने फ्री किकच्या माध्यमातून गोल करण्याचा प्रयत्न केला, मात्र बार्सिलोनाच्या गोलरक्षकाने हा प्रयत्न यशस्वी होऊ दिला नाही. त्यानंतर दोन मिनिटांनी बार्सिलोनातर्फे प्रेडो रॉड्रिग्जने मालिकेतील तिसरा गोल नोंदवला आणि संघाचे गोलचे खाते उघडले. मध्यंतरानंतर ख्रिस्तियन टेलोच्या हातून स्वयंगोल झाल्याने बार्सिलोनाच्या खात्यात आणखी एका गोलाची भर पडली. बार्सिलोनाच्या तुलनेत अननुभवी असलेल्या कार्टाजेना संघाला बार्सिलोनाचे आक्रमण थोपवण्यात आणि भक्कमपणे बचाव करण्यात अपयश आले. निर्धारित वेळ संपण्यासाठी तीन मिनिटे असताना नेयमारने आंद्रेस इनेस्टाच्या क्रॉसवर सुरेख गोल करत बार्सिलोनाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. मूळच्या ब्राझीलच्या नेयमारने सेल्टिकविरुद्धच्या सामन्यात हॅट्ट्रिक नोंदवली, तर व्हिलारिअलविरुद्ध दोन गोल केले होते.
अन्य लढतींमध्ये मलागा आणि ओसास्युना यांच्यातील लढत १-१ अशी बरोबरीत संपली. गेटाफेने गिरोना एफसीवर ४-१ अशी मात केली.

Story img Loader