नेयमारने बार्सिलोनातर्फे पहिला गोल करत संघाला स्पॅनिश सुपर लीगमधील पहिल्या टप्प्यातील सामन्यात अ‍ॅटलेटिको माद्रिदशी १-१ अशी बरोबरी साधून दिली. मात्र बार्सिलोनाचा आधारस्तंभ लिओनेल मेस्सीला दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले, ही बार्सिलोनासाठी धोक्याची घंटा ठरणार आहे.
नव्या संघाकडून खेळताना डेव्हिड व्हिलाने १२व्या मिनिटालाच खाते उघडत अ‍ॅटलेटिको माद्रिदला सुरेख सुरुवात करून दिली. अ‍ॅटलेटिको माद्रिदच्या भक्कम बचावासमोर आक्रमणे रचताना बार्सिलोनाला अडचणी येत होत्या. मांडीचे स्नायू ताणले गेल्यामुळे दुसऱ्या सत्रात मेस्सी मैदानावर उतरला नाही. मेस्सीच्या अनुपस्थितीत नेयमार बार्सिलोनासाठी धावून आला. नेयमारने ६५व्या मिनिटाला दानी अल्वेसच्या क्रॉसवर गोल करून बार्सिलोनाला बरोबरी साधून दिली.
मेस्सीच्या दुखापतीबाबत बार्सिलोनाचे अध्यक्ष गेराडरे मार्टिनो म्हणाले, ‘‘पायावर जोरदार मार बसल्यामुळे त्याच्या मांडीचे स्नायू ताणले गेले. आता त्याच्या दुखापतीची पाहणी करून पुढील सामन्यात त्याच्या समावेशाविषयीचा निर्णय घेण्यात येईल.’’ बार्सिलोनाने सुरुवातीपासूनच हल्ले चढवत अ‍ॅटलेटिको माद्रिदच्या बचावपटूंवर दडपण आणले होते. ११व्या मिनिटाला प्रेडोने मारलेला फटका अ‍ॅटलेटिकोचा गोलरक्षक थिबाऊट कोर्टिसने परतवून लावला. मात्र प्रतिहल्ले चढवत व्हिलाने अर्डा टुरानच्या पासवर गोल करत अ‍ॅटलेटिकोला आघाडीवर आणले. त्यानंतर दोन्ही संघांनी गोल करण्यासाठी बरेच प्रयत्न केले. अखेर दुसऱ्या सत्रात नेयमारने बार्सिलोनासाठी गोल करत सामना बरोबरीत सोडवला.

Story img Loader