‘फिफा’ विश्वचषकानंतर नेयमारची जादू पुन्हा एकदा अनुभवायला मिळाली. सिंगापूरमध्ये झालेल्या मैत्रीपूर्ण लढतीत नेयमारने केलेल्या चार गोलमुळे पाच वेळा विश्वविजेत्या ठरलेल्या ब्राझीलने जपानचा ४-० असा धुव्वा उडवला. या कामगिरीमुळे नेयमारने ब्राझीलसाठी ५८ सामन्यांत तब्बल ४० गोलांची नोंद केली.
‘फिफा’ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारणाऱ्या अर्जेटिनाचा पाडाव केल्याच्या तीन दिवसानंतर २२ वर्षीय नेयमारला रोखणे जपानसाठी कठीण गेले. एक डाव्या पायाने, एक उजव्या पायाने आणि एक डोक्याने गोल करीत नेयमारने आपल्या सर्वागसुंदर खेळाचे दर्शन घडवले. जपानचा धसमुसळा बचाव भेदताना नेयमारला फारसे प्रयास पडले नाहीत. सामन्यात तब्बल चार गोल झळकावत नेयमारने आपल्या खेळाद्वारे स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या ५० हजारांपेक्षा मंत्रमुग्ध केले.
जपानने कैसुके होंडा आणि शिंजी कागावा या अव्वल खेळाडूंना विश्रांती देत युवा खेळाडूंवर भर दिला. नेयमारने दिएगो टार्डेलीच्या साथीने जपानच्या गोलक्षेत्रात अनेक हल्ले चढवले. १८व्या मिनिटाला टार्डेलीने जपानच्या बचावपटूंना भेदत गोलक्षेत्रात कूच केल्यानंतर नेयमारकडे चेंडू सोपवला. त्यानंतर नेयमारने जपानचा गोलरक्षक ईजी कावाशिमा याला चकवून पहिला गोल केला. दुसऱ्या सत्रात नेयमारचा जलवा पाहायला मिळाला. ४८व्या मिनिटाला कुटिन्होच्या पासवर नेयमारने दुसरा गोल लगावला. ७७व्या मिनिटाला नेयमारने हेडरद्वारे गोल करून हॅट्ट्रिक साजरी केली. त्यानंतर काकाने दिलेल्या क्रॉसवर नेयमारने चौथा गोल साकारत ब्राझीलला दणदणीत विजय मिळवून दिला. डुंगा यांच्या नवनियुक्त प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली खेळताना ब्राझीलने सलग चार विजय मिळवले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा