वय वर्षे २२.. विश्वचषकाचा सलामीचा सामना.. क्रोएशियासारख्या फसव्या प्रतिस्पध्र्याशी मुकाबला.. घरच्या मैदानावर होणारा सामना आणि लाखो चाहत्यांच्या अपेक्षांचे ओझे.. दडपण आणणारी ही समीकरणे बाजूला सारत किमयागार नेयमारने ब्राझीलला दिमाखदार विजय मिळवून दिला.. स्पर्धेतील लक्ष्यवेधी खेळाडूंमध्ये समावेश का होतो, याचा प्रत्यय नेयमारने आपल्या खेळाने दिला.
१९५०मध्ये मायदेशात झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम लढतीत उरुग्वेने ब्राझीलचे विश्वविजेतेपदाचे स्वप्न संपुष्टात आणले होते. तब्बल ६४ वर्षांनंतर ब्राझीलला मायभूमीत विश्वविजेतेपद साकारण्याची संधी मिळाली आहे. त्यादृष्टीने तरुण आणि तडफदार नेयमार ब्राझीलच्या योजनांचा महत्त्वाचा भाग होता आणि समयोचित खेळाने त्याने आपली उपयुक्तता सिद्ध केली. कॉन्फेडरेशन चषकातही नेयमारच ब्राझीलच्या अभियानाचा मानबिंदू होता. कॉन्फेडरेशनच्या तुलनेत विश्वचषकाचा पसारा खूपच मोठा आहे. पण वाढीव जबाबदारीने न डगमगता या युवा खेळाडूने आपली कर्तबगारी सिद्ध केली. मार्सेलोच्या स्वयंगोलमुळे ब्राझीलवरील दडपण वाढले होते, पण दोन गोलांसह नेयमारने ब्राझीलच्या विश्वचषक अभियानाची यशस्वी सुरुवात केली.
ब्राझीलने नेहमीप्रमाणेच आक्रमक व्यूहरचना अवलंबली होती. क्रोएशियानेही हेच तत्त्व अवलंबल्याने सामना सुरू झाल्यानंतर दोन्ही संघ सारखेच भासत होते. मात्र हळूहळू ब्राझीलने चेंडूवरचे नियंत्रण वाढवले. विश्वचषकातला पहिला गोल स्वयंगोल व्हावा, हा दुर्मीळ योगायोग. बचावपटू मार्सेलो चेंडू रोखण्यासाठीच्या प्रयत्नांत पळत होता. तीन खेळाडूंना भेदत चेंडू वेगाने मार्सेलोच्या पायाला लागून गोलजाळ्यामध्ये जाऊन विसावला. बचावपटू मार्सेलोची यात चूक होती असे म्हणता येणार नाही. गोष्टी इतक्या वेगाने घडल्या की चेंडू त्याच्या नकळत पायाला लागून गोलजाळ्यात गेला आणि क्रोएशियाने खाते उघडले. अनपेक्षितपणे पिछाडीवर पडलेल्या ब्राझीलने या गोलनंतर जोरदार आक्रमणाचे सत्र आरंभले. ऑस्कर यामध्ये आघाडीवर होता. त्याच्या प्रयत्नांचे गोलमध्ये रूपांतर झाले नाही, मात्र क्रोएशियाच्या खेळाडूंवरील दडपण वाढले. याचाच फायदा उठवत नेयमारने ऑस्करच्याच पासवर सुरेख गोल करत ब्राझीलला बरोबरी करून दिली. ज्याच्याकडून अपेक्षा होत्या त्या नेयमारनेच गोल केल्याने ब्राझीलकरांच्या उत्साहाला उधाण आले. दुसऱ्या सत्रात क्रोएशियाच्या शिस्तबद्ध प्रयत्नांमुळे ब्राझीलचा वेग मंदावला. दानी आल्वेस फ्री किकची संधी गोलमध्ये रूपांतरित करू शकला नाही. ब्राझीलच्या खेळाडूला रोखण्याचा क्रोएशियाने प्रयत्न केल्यामुळे सामनाधिकाऱ्यांनी ब्राझीलला पेनल्टी किक देण्याचा निर्णय घेतला. क्रोएशियाच्या खेळाडूने जाणीवपूर्वक ब्राझीलच्या खेळाडूला रोखण्याचा प्रयत्न केला होता. या पेनल्टी किकचा पुरेपूर उपयोग करत नेयमारने आणखी एक गोल केला. संपूर्ण सामन्यात ब्राझील संघाचे चैतन्य म्हणून वावरणाऱ्या ऑस्करने शेवटच्या क्षणांमध्ये शानदार गोल करत ब्राझीलच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
ब्राझीलच्या खेळाचे वैशिष्टय़ म्हणजे त्यांच्या खेळात दडपण जाणवले नाही. आपल्याला सर्वोत्तम खेळ करायचा आहे आणि जिंकायचे आहे, हा निर्धार त्यांनी पूर्णत्वास नेला. प्रशिक्षक स्कोलारी यांची भूमिका निर्णायक ठरली. पहिलाच सामना असल्याने त्यांनी या सामन्यात काही खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला. प्रमुख खेळाडूंवर दडपण येऊ नये, यादृष्टीने त्यांचे हे पाऊल अचूक होते. ब्राझीलचा पुढचा मुकाबला मेक्सिकोशी होणार आहे. त्या सामन्यात विजय मिळवला तर बाद फेरीच्या दिशेने त्यांची आगेकूच पक्की होऊ शकते. दुसरीकडे क्रोएशियाला कॅमेरूनविरुद्धची पुढची लढतजिंकणे अनिवार्य झाले आहे. चाहत्यांना सुखावणाऱ्या विजयासह ब्राझीलने विश्वचषक अभियानाची दणक्यात सुरुवात केली आहे. यापुढेही किमयागार नेयमार त्यांच्या डावपेचांचा अविभाज्य घटक असेल.

Story img Loader