जर्मनीला अंतिम फेरीत हरवून अर्जेटिनाला लिओनेल मेस्सीने जगज्जेतेपद जिंकून द्यावे, ही इच्छा प्रदर्शित केली आहे ब्राझीलचा आघाडीचा फुटबॉलपटू नेयमारने. दुखापतीमुळे नेयमारला विश्वचषकातून माघार घ्यावी लागली आणि नंतर ब्राझीलचे आव्हानच संपुष्टात आले. या साऱ्या घटनाक्रमामुळे खचलेला नेयमार पत्रकार परिषदेत ढसाढसा रडू लागला.
ब्राझीलने मायभूमीत सहाव्यांदा विश्वविजेतेपद जिंकण्याचे मनसुबे बाळगले होते. परंतु जर्मनीने ७-१ असा धुव्वा उडवल्यामुळे त्यांचे स्वप्न भंगले. परंतु आता आपला बार्सिलोना संघातील सहकारी मेस्सी जगज्जेतेपदावर नाव कोरेल, असे मत नेयमारने व्यक्त केले आहे.
‘‘खेळामधील मेस्सीचा इतिहास खूप महत्त्वाचा आहे. त्याने अनेक अजिंक्यपदे जिंकली आहेत. एक चांगला मित्र आणि सहकारी म्हणून मी मेस्सीला शुभेच्छा देऊन त्याचे समर्थन करणार आहे,’’ असे नेयमारने सांगितले.
कोलंबियाविरुद्धच्या सामन्यात बचावपटू ज्युआन कॅमिलो झुनिगाचा धक्का लागल्यामुळे नेयमारच्या पाठीच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली. पाठीवर आघात झाल्यावरच आपण गत:प्राण झाल्यासारखे मला वाटले, हे आठवल्यामुळे यावेळी नेयमारच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले.
‘‘मी सुदैवाने बचावलो, अन्यथा मला व्हीलचेअरचेच साहाय्य घ्यावे लागले असते. माझ्या कारकिर्दीमधील महत्त्वाच्या क्षणी हे घडले. त्यामुळे त्याचा सामना करणे खूप कठीण गेले,’’ असे नेयमारने सांगितले.
‘‘हे आव्हान आणि घडलेली घटना ही स्वीकारणे मला जड जात आहे. मी कॅमिलोशी अजून बोललेलो नसल्याने त्याने द्वेषभावनेने हे कृत्य केल्याचे मला म्हणायचे नाही, परंतु फुटबॉल समजणारा प्रत्येक जण हे सांगू शकतो की, हे आव्हान साधे नव्हते,’’ असे तो पुढे म्हणाला.
‘‘जेव्हा कुणी तरी पाठीमागून येतो, तेव्हा आपण काहीच करू शकत नाही. मला जे घडले, ते रोखता आले नाही. खिन्न मनाने मला मैदान सोडावे लागले,’’ असे नेयमारने सांगितले. या दुखापतीमुळे नेयमार पुढील अनेक आठवडे फुटबॉल खेळू शकणार नाही, परंतु फिफाने मात्र झुनिगावर कोणतीही कारवाई न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. नेयमारची अनुपस्थिती आणि कर्णधार थिआगो सिल्वाचे निलंबन यामुळे ब्राझीलच्या संघाला उपांत्य फेरीत जर्मनीकडून मानहानीकारक पराभव पत्करावा लागला.

Story img Loader