नेयमारच्या अद्भुत गोलच्या जोरावर बार्सिलोनाने चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत पॅरिस सेंट जर्मेन संघावर ३-१ असा विजय मिळवला. अन्य लढतीत, चॅम्पियन्स लीग स्पर्धेत ५०वी लढत खेळणाऱ्या समीर नसरीने मँचेस्टर सिटीच्या रोमा संघावरील २-० विजयात निर्णायक भूमिका बजावली. बार्सिलोनाविरुद्ध लाटान इब्राहिमोव्हिकने १५व्या मिनिटालाच गोल करत सेंट पॅरिस जर्मेनचे खाते उघडले. त्यांचा हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. कारण लिओनेल मेस्सीने १९व्या मिनिटाला गोल करत बरोबरी केली. मध्यंतराला चार मिनिटे बाकी असताना नेयमारने केलेल्या अफलातून गोलच्या बळावर बार्सिलोनाने आघाडी घेतली. प्रतिस्पर्धी खेळाडूचा चावा घेतल्याप्रकरणी टीकेचे लक्ष्य ठरलेल्या ल्युइस सुआरेझने बार्सिलोनाचे प्रतिनिधित्व करताना पहिलाच गोल केला. उर्वरित वेळात बचाव मजबूत करत बार्सिलोनाने विजय मिळवला. या पराभवामुळे यंदाच्या हंगामात अपराजित राहण्याची किमया साधणाऱ्या सेंट पॅरिस जर्मेन संघाची विजयी परंपरा खंडित झाली.

Story img Loader