लंडन : ऑस्ट्रेलियाचा बिगरमानांकित खेळाडू निक किरियॉसने पिछाडीवरून दमदार पुनरागमन करताना चौथ्या मानांकित स्टेफानोस त्सित्सिपासचा पराभव करत विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. तसेच पुरुषांमध्ये २२ ग्रँडस्लॅम विजेता राफेल नदाल, तर महिलांमध्ये चौथ्या मानांकित पॉला बदोसा आणि १७व्या मानांकित एलेना रायबाकिनाने आगेकूच केली.

पुरुष एकेरीच्या चौथ्या फेरीच्या सामन्यात किरियॉसने ग्रीसच्या त्सित्सिपासवर ६-७ (२-७), ६-४, ६-३, ७-६ (७-९) अशी चार सेटमध्ये मात केली. तीन तास आणि १७ मिनिटे चाललेल्या या सामन्यात दोन्ही खेळाडूंची आक्रमक वृत्ती दिसून आली. दोन्ही खेळाडूंना गैरवर्तनामुळे पंचांनी ताकीदही दिली. त्सित्सिपासने पहिला सेट टायब्रेकरमध्ये जिंकल्यानंतर किरियॉसने आपल्या खेळाची गती वाढवली. तसेच सव्‍‌र्हिस करताना त्याने दोन गुणांच्या दरम्यान त्सित्सिपासला तयार होण्यासाठी फारसा वेळही दिला नाही. याचा त्सित्सिपासच्या खेळावर आणि मानसिकतेवर नकारात्मक परिणाम झाला. याचा फायदा घेत किरियॉसने पुढील तिन्ही सेट जिंकत उपउपांत्यपूर्व फेरी गाठली.

तसेच दुसऱ्या मानांकित स्पेनच्या नदालने इटलीच्या लोरेंझो सोनेगोला ६-१, ६-२, ६-४ असे सरळ सेटमध्ये पराभूत केले. पुढील फेरीत नदालपुढे २१व्या मानांकित नेदरलंड्सच्या बोटिक व्हॅन डी झँडशूल्पचे आव्हान असेल. झँडशूल्पने तिसऱ्या फेरीत फ्रान्सचा अनुभवी खेळाडू रिचर्ड गॅस्केचा ७-५, २-६, ७-६ (९-७), ६-१ असा पराभव केला. ब्रिटनच्या नवव्या मानांकित कॅमरुन नॉरीने अमेरिकेच्या टॉमी पॉलला ६-४, ७-५, ६-४ असे सरळ सेटमध्ये नमवत उपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान निश्चित केले.

महिलांमध्ये स्पेनच्या बदोसाने २५व्या मानांकित पेट्रा क्विटोव्हाला ७-५, ७-६ (७-४) असे नमवत उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला. कझाकस्तानच्या रायबाकिनाने चीनच्या क्विनवेन झेंगवर ७-६ (७-४), ७-५ अशी मात करत आगेकूच केली. जर्मनीच्या तात्जाना मारिआने १२व्या मानांकित लॅटवियाच्या एलिना ओस्टापेन्कोला पिछाडीवरुन ५-७, ७-५, ७-५ असे पराभूत करत उपांत्यपूर्व फेरी गाठली.

भारताची सानिया मिर्झा आणि तिचा क्रोएशियाचा साथीदार मॅट पॅव्हिचने मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला. प्रतिस्पर्धी जोडीने माघार घेतल्याने त्यांना पुढे चाल मिळाली.

Story img Loader