यंदाच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेनंतर टीम इंडियाला नवीन प्रशिक्षक मिळण्याची अपेक्षा आहे. विश्वचषकानंतर प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपत आहे आणि बीसीसीआय नवीन प्रशिक्षकाच्या शोधात आहे. दरम्यान, संघाशी संबंधित आणखी एका दिग्गज व्यक्तीने संघ सोडण्याची घोषणा केली आहे. टीम इंडियाचे स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग प्रशिक्षक निक वेब विश्वचषकानंतर संघ सोडतील. त्यांनी यासंदर्भात बीसीसीआयला कळवले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपनंतर टीम इंडियासोबत राहणाऱया निक वेब यांनी सांगितले, ”८ महिने कुटुंबापासून दूर राहणे योग्य नाही. गेल्या दोन वर्षांत मला भारत, बीसीसीआय आणि टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान मिळाला आहे. या काळात आम्ही एक संघ म्हणून बरेच काही साध्य केले. आम्ही सामनेही गमावले आणि जिंकले. पण सातत्याने आव्हान स्वीकारणे आणि चांगली कामगिरी करणे हे विशेष होते.”

निक वेब म्हणाले, ”न्यूझीलंडमध्ये करोनामुळे घातलेल्या निर्बंधांमुळे, मी टी-२० विश्वचषकानंतर आपला करार वाढवू शकणार नाही. २०१९च्या विश्वचषकानंतर मी टीम इंडियाशी जोडलो गेलो. मी शंकर बसू यांची जागा घेतली होती.” यापूर्वी वेब यांनी न्यूझीलंड महिला संघ आणि होम टीम सेंट्रल डिस्ट्रिक्टमध्ये काम केले होते. त्याच्या कार्यकाळात टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी पात्र ठरली. याशिवाय भारताने ऑस्ट्रेलियातही मालिका जिंकली.

हेही वाचा – IPL 2021 Playoffs: …तर शेवटचा सामना खेळण्याआधी आजच ‘मुंबई इंडियन्स’ होणार OUT

वेब म्हणाले, ”हा निर्णय सोपा नव्हता, पण कुटुंबाला प्रथम स्थान दिले पाहिजे. देशात करोनाच्या बंदीमुळे मला हा निर्णय घ्यावा लागला. मला माहीत नाही, की भविष्य काय असेल. पण टी-२० विश्वचषकात मला टीम इंडियाला शक्य ती सर्व मदत करायची आहे.” विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा सामना २४ ऑक्टोबरला पाकिस्तानशी होणार आहे. २००७ पासून संघाने टी-२० विश्वचषक जिंकलेला नाही.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nick webb to step down as indias strength and conditioning coach after world cup adn