दिनेश कार्तिकच्या आक्रमक खेळीने निदहास चषकाच्या अंतिम सामन्यात भारताने बांगलादेशवर मात केली. शेवटच्या चेंडूवर ५ धावांची गरज असताना कार्तिकने षटकार खेचत बांगलादेशच्या मनसुब्यांवर पाणी फिरवलं. शेवटचा षटकार खेचल्यानंतर भारतीय संघाने मैदानात धाव घेत आपला आनंद साजरा केला. कार्तिकने अखेरच्या चेंडूवर खेचलेल्या षटकाराला सोशल मीडियातूनही चांगलाच प्रतिसाद मिळतो आहे, मात्र भारताचा कर्णधार रोहित शर्मानेच कार्तिकचा तो वादळी षटकार पाहिला नसल्याचं समोर येतंय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अवश्य वाचा – India vs Bangladesh T20 : शेवटच्या चेंडूवर षटकार मारत भारताने मिळवला विजय

अखेरच्या चेंडूवर ५ धावांची गरज असताना सामना अनिर्णित राहील या अंदाजाने रोहित शर्मा सुपरओव्हरसाठी तयार व्हायला ड्रेसिंग रुममध्ये गेला. मात्र तोपर्यंत कार्तिकने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं होतं. खुद्द रोहितने सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत याची कबुली दिली आहे. “ज्या प्रकारे दिनेश कार्तिकने खेळ केलाय, एक कर्णधार म्हणून मला त्याचा अभिमान आहे. अखेरच्या षटकात फटकेबाजी करण्यात तो तरबेज असल्यामुळेच आम्ही त्याला राखून ठेवलं होतं, आणि आमच्या अपेक्षेप्रमाणेच कार्तिकने खेळ केला. या खेळीतून दिनेशने त्याच्यातलं कसब पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे”, रोहितने दिनेश कार्तिकचं कौतुक केलं.

निदहास चषकासाठी भारतीय निवड समितीने महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली, कुलदीप यादव, हार्दिक पांड्या यांसारख्या प्रमुख खेळाडूंना विश्रांती देऊन तरुणांना संघात जागा दिली होती. धोनीच्या अनुपस्थितीत दिनेश कार्तिकच्या खांद्यावर यष्टीरक्षणाची जबाबदारी आली होती. ही जबाबदारीही समर्थपणे पेलत दिनेश कार्तिकने पुन्हा एकदा आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. दिनेश कार्तिकव्यतिरीक्त फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरनेही गोलंदाजीत सर्वांना आपली दखल घ्यायला भाग पाडलं.

अवश्य वाचा – India vs Bangladesh T20: अंतिम सामन्यात सर्वोत्तम गोलंदाजी करत युजवेंद्र चहल पाचव्या स्थानावर

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nidahas trophy final 2018 here is the reason why rohit sharma did not watch dinesh karthik last ball six