निदहास तिरंगी मालिकेतील अंतिम सामन्यात भारताने अखेरच्या चेंडूवर बांगलादेशला पराभवाची धूळ चारली. या सामन्यात सौम्या सरकारच्या गोलंदाजीवर दिनेश कार्तिकने अखेरच्या चेंडूवर खेचलेला षटकार हा संपू्ण भारतभर चर्चेचा विषय बनला आहे. सामना संपल्यानंतरही सोशल मीडियावर कार्तिकच्या या वादळी खेळीची चर्चा सुरु आहे. मात्र या सामन्यात दिनेश कार्तिकऐवजी विजय शंकरला फलंदाजीत बढती देण्याच्या निर्णयावर सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केलं होतं. विजय शंकरने अखेरच्या षटकात फलंदाजी करताना काही चेंडू वाया घालवले व मोक्याच्या क्षणी आपली विकेट फेकली. मात्र कार्तिकने अखेरच्या चेंडूवर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने षटकार खेचत भारताला विजय मिळवून दिला. मात्र कार्तिक अखेरच्या चेंडूवर षटकार खेचण्यात अपयशी ठरला असता तर माझं काही खरं नव्हतं असं म्हणत विजय शंकरने कार्तिकचे आभार मानले आहेत.
अवश्य वाचा – धोनीच श्रेष्ठ, मी अजूनही विद्यार्थी -कार्तिक
“सामना संपल्यानंतरही माझ्या मनात त्या अखेरच्या षटकाराबद्दल विचार येत होते. जर कार्तिक अखेरच्या चेंडूवर षटकार खेचण्यात अपयशी ठरला असता आणि आम्ही सामना हरलो असतो, तर माझं काही खरं नव्हतं. याचसोबत जर फलंदाजीदरम्यान मी चेंडू वाया घालवले नसते तर भारताला विजयासाठी अखेरच्या चेंडूपर्यंत थांबायची वेळ आली नसती. त्यामुळे कार्तिकने तो षटकार खेचून भारताला सामना जिंकवून दिला याबद्दल मी त्याचा खरंच आभारी आहे. मात्र याचवेळी सामना जिंकवून देण्यासाठी माझ्याकडे आलेली संधी मी गमावली याचीही सल मला कायम राहणार आहे.” इंडियन एक्स्प्रेस या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत विजय शंकर बोलत होता.
अवश्य वाचा – ….म्हणून रोहित शर्माने दिनेश कार्तिकचा तो षटकार पाहिलाच नाही!
ज्यावेळी मी फलंदाजीसाठी मैदानात उतरलो त्यावेळी मला मैदानात नेमका कसा खेळ करायचा आहे याची कल्पना होती. मैदानावर आधीपासून स्थिरावलेल्या मनिष पांडेला जास्तीत जास्त फलंदाजीची संधी देऊन एखादा खराब चेंडू आल्यास त्यावर मोठा फटका खेळण्याचं मी ठरवलं होतं. त्याप्रमाणे मी काहीकाळ फलंदाजी केलीही, मात्र अखेरच्या षटकांमध्ये मला संयमी खेळी करता आली असती, जी माझ्याकडून झाली नाही, आपली बाजू मांडताना विजय शंकर बोलत होता. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात भारताने विजय जरी मिळवला असला तरीही कार्तिकऐवजी शंकरला फलंदाजीत बढती देण्याच्या भारतीय संघ व्यवस्थापनाच्या निर्णयावर चांगलीच टीका झाली होती.
अवश्य वाचा – कठीण परिस्थिती हाताळण्यात कार्तिक तरबेज!