निदहास चषक तिरंगी मालिकेत भारताने बांगलादेशवर मात करुन १७ धावांनी विजय संपादन केला. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने केलेली आक्रमक ८९ धावांची खेळी चर्चेचा विषय ठरली. आपल्या या अर्धशतकी खेळीदरम्यान रोहितने आणखी एक विक्रम आपल्या नावे केला आहे. टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार खेचणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मा आता पहिल्या क्रमांकावर आला आहे. रोहितने युवराजच्या नावावर असलेला विक्रम मोडला आहे.
आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये युवराजसिंहच्या नावावर ७४ षटकारांची नोंद आहे. काल बांगलादेशविरुद्धच्या खेळीत रोहितने मैदानात चौफेर फटकेबाजी करत युवराज सिंहला मागे टाकलं. रोहितच्या नावावर आता ७५ षटकारांची नोंद आहे. रोहित शर्मा आणि युवराज सिंह यांच्या व्यतिरीक्त सर्वाधिक षटकारांच्या यादीत सुरेश रैना (५४ षटकार), महेंद्रसिंह धोनी (४६ षटकार), विराट कोहली (४१ षटकार) हे खेळाडू आहेत.
अवश्य वाचा – वॉशिंग्टनची ‘सुंदर’ कामगिरी, भारताची बांगलादेशवर १७ धावांनी मात
बांगलादेशविरुद्ध विजयासह भारतीय संघाने तिरंगी मालिकेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकारांच्या विक्रमासोबत रोहितच्या नावावर एका वर्षात सर्वाधिक षटकार खेचण्याचा विक्रमही जमा आहे. २०१७ वर्षात रोहितने ६४ षटकार ठोकले होते.