घरच्या मैदानावर इथिओपियाचा २-० असा पराभव करून नायजेरियाने पुढील वर्षी ब्राझीलमध्ये होणाऱ्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी पात्र होण्याचा मान पटकावला आहे. पहिल्या टप्प्यातील सामन्यात नायजेरियाने २-१ असा विजय मिळवला होता.
विक्टर मोझेस याने २०व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीवर गोल करून नायजेरियाला आघाडी मिळवून दिली. विक्टर ओबिनाना याने ८२व्या मिनिटाला फ्री-किकवर दुसरा गोल करून नायजेरियाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. आफ्रिकन देशांची स्पर्धा जिंकणाऱ्या नायजेरियाने पाचव्यांदा फिफा विश्वचषकात खेळण्याचा मान मिळवला आहे. यापूर्वी १९९४, १९९८, २००२ आणि २०१० साली झालेल्या विश्वचषकात नायजेरियाने स्थान मिळवले होते.
कलाबार येथील यूजे युसेन स्टेडियमवर शनिवारी रात्री झालेल्या या सामन्यात ओबिनाना याने दुसरा गोल करेपर्यंत इथिओपियाला सामन्यात पुनरागमन करण्याची संधी होती, कारण नायजेरियाचा खेळ सुमार दर्जाचा होत होता. सामन्याच्या सुरुवातीलाच एफे अ‍ॅम्ब्रोजला गोल करण्याची संधी चालून आली होती, पण इथिओपियाचा गोलरक्षक सिसाय बांचा याने अ‍ॅम्ब्रोजचे प्रयत्न धुडकावून लावले. त्यानंतर बांचाने ब्राऊन इडेये यानेही मारलेला फटका अचूक अडवला.

Story img Loader