नायजेरिया म्हणजे आफ्रिकेचे राजे.. आपल्या दमदार खेळाच्या जोरावर त्यांनी आफ्रिकेची मने जिंकली.. आणि आता विश्वचषकात अर्जेटिनासारख्या बलाढय़ संघाला पराभूत करून फुटबॉल विश्वाची मने जिंकण्यासाठी नायजेरियाचा संघ सज्ज झाला असेल.. कारण अर्जेटिनाला पराभूत केल्यावरच त्यांना १९९८ नंतर पहिल्यांदाच बाद फेरीचे दरवाजे उघडू शकतात. पण नायजेरियाला बाद फेरीत पोहोचण्यासाठी लिओनेल मेस्सीचा मोठा अडथळा पार करावा लागेल.
या सामन्यातील जय-पराजयाने अर्जेटिनाला कसलाही फरक पडणार नाही, कारण दोन्ही सामन्यांतील विजयासह त्यांनी बाद फेरी गाठलेली आहे. पण त्यांच्यासाठी ही लढाई प्रतिष्ठेची आणि टीकेला चोख उत्तर देणारी ठरणार आहे.
नायजेरियाच्या संघाने आतापर्यंत दोन सामने खेळले असून त्यांनी इराणबरोबर गोलशून्य बरोबरी साधली होती, तर दुसऱ्या सामन्यात त्यांनी बोस्निया आणि हेझ्रेगोव्हिनावर १-० असा विजय मिळवला होता. आता त्यांच्या खात्यात तीन गुण असून त्यांना बाद फेरीत पोहोचायचे असल्यास त्यांना हा सामना जिंकावा लागेल. पण या सामन्यात ते पराभूत झाले आणि इराणने बोस्नियावर विजय मिळवला तर त्यांचे बाद फेरीचे स्वप्न धुळीस मिळू शकते.
अर्जेटिनाचा संघ दादा वाटत असला तरी आतापर्यंत विश्वचषकात त्यांना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही आणि म्हणूनच दोन्ही सामने जिंकून ते टीकेचे धनी ठरले आहेत. बोस्नियासारख्या दुबळ्या समजल्या जाणाऱ्या संघाने त्यांचा बचाव भेदत गोल केला होता, इराणसारख्या देशाबरोबर खेळताना त्यांना पूर्ण वेळेत गोल करता आला नव्हता. मेस्सीने अतिरिक्त वेळेत गोल लगावला नसता तर अर्जेटिनाचे काही खरे नव्हते. त्यामुळे अर्जेटिनाला या सामन्यात नक्कीच खेळाडूंवर मेहनत घ्यावी लागणार आहे.
‘फ’ गट : अर्जेटिना वि. नायजेरिया
सामना क्र. ४३
स्थळ : इस्टाडिओ बेइरा रिओ, पोटरे अलेग्रे ल्ल वेळ : रात्री ९.३० वा.पासून
लक्षवेधी खेळाडू
पीटर ओडेमविंगी (नायजेरिया) : गेल्या दोन सामन्यांमध्ये नायजेरियाला फक्त एक गोल करता आला आहे आणि या एका गोलच्या जोरावर नायजेरियाचा तारणहार ठरला आहे पीटर ओडेमविंगी. बोस्नियाविरुद्धच्या सामन्यामध्ये त्याने झकास गोल करत सर्वाची मने जिंकून घेतली आहेत. पण त्याला अर्जेटिनाचा बचाव भेदून नायजेरियाला बळकटी मिळवून देता येईल का, हे पाहावे लागेल. पीटरकडे इंग्लिश प्रीमिअर लीगचा चांगलाच अनुभव आहे.
लिओनेल मेस्सी (अर्जेटिना) : इराणविरुद्धच्या सामन्यात अफलातून गोल साकारत अर्जेटिनाच्या लिओनेल मेस्सीने आपला दर्जा दाखवून दिला होता. आता नायजेरियाविरुद्धच्या सामन्यात त्याची जादू चालेल का, याकडे साऱ्यांचे लक्ष असेल. चपळ, संयत खेळ करत प्रतिस्पध्र्याला कोणताच थांगपता न लागता गोल करण्याची मेस्सीची खुबी आहे. त्यामुळे तो नायजेरियाच्या रडारवर अग्रस्थानी असेल.
व्यूहरचना
गोलपोस्ट
जेव्हा लोकांकडून स्वत:बद्दल, संघाबद्दल चांगले ऐकायला मिळत नाही, तेव्हा नक्कीच दु:ख होते. पण सर्वच सामन्यांमध्ये झोकून देऊन खेळायचे नसते. प्रत्येक सामन्यासाठी आमच्याकडे वेगळी रणनीती आहे आणि त्यानुसार आम्ही खेळत आहोत. बाद फेरीमध्ये चाहत्यांना आमचा खरा खेळ दिसून येईल आणि तेव्हा त्यांची मतेही बदलतील.
– अँजेल डी मारिआ, अर्जेटिना
मेस्सी हा एक महान खेळाडू असला तरी तो माणूसच आहे. माणसाकडून चुकाही होत असतात. आतापर्यंत मेस्सीची चमक विश्वचषकात पाहायला मिळालेली नाही. हा सामना जिंकून आम्हाला बाद फेरीत पोहोचता येऊ शकते. त्यामुळे या सामन्यात आम्ही झुंजार वृत्तीने खेळू. अर्जेटिनाला रोखण्याची धमक आमच्यामध्ये आहे आणि तेच आमचे लक्ष्य असेल.
जोसेफ योबो, नायजेरिया