सलामीच्या सामन्यात ताहितीविरुद्ध सहा गोल झळकावणाऱ्या ‘सुपर ईगल्स’ नायजेरियाची ‘ब’ गटातील दुसऱ्या सामन्यात मागील विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत मजल मारणाऱ्या उरुग्वेसमोर अग्निपरीक्षा लागणार आहे. गुरुवारी होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात ‘फिफा’ विश्वचषक विजेत्या स्पेनसमोर जागतिक क्रमवारीत १३८व्या स्थानी असणाऱ्या ताहिती संघाचा सोपा पेपर असणार आहे. या सामन्यात स्पेन संघ किती गोल नोंदवतो, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
नायजेरियाने या सामन्यात विजय मिळवल्यास ते थेट उपांत्य फेरीत मजल मारतील. ताहितीविरुद्ध ६-१ असा विजय मिळवला तरी गोल करण्याच्या अनेक संधी वाया घालवल्यामुळे त्यांच्यावर टीकेचा भडिमार झाला. त्यामुळेच प्रशिक्षक स्टीफन केशी यांनी आघाडीवर ब्राऊन इडेये याला उरुग्वेविरुद्ध संधी दिली आहे. विश्वविजेत्या स्पेनविरुद्धच्या सामन्यात चेंडूवर २९ टक्के ताबा मिळवण्यात यश मिळाले तरी उरुग्वे संघात कोणतेही बदल न करण्याचे प्रशिक्षक ऑस्कर टाबारेझ यांनी ठरवले आहे. एडिन्सन कावानी आणि लुइस सुआरेझ हे फॉर्मात असलेले खेळाडू चमकले तर उरुग्वेला नायजेरियावर विजय मिळवणे कठीण जाणार नाही.
विन्सेन्ट डेल बॉस्के यांच्या नेतृत्वाखालील स्पेनचा संघ हा जगातील सर्वोत्तम मानला जात आहे. त्याउलट ताहिती संघात एकमेव व्यावसायिक फुटबॉलपटूचा समावेश आहे. त्यामुळे गुरुवारी रात्री रंगणारा सामना हा एकतर्फी होणार, हे निश्चित आहे. १९व्या क्रमांकावरील उरुग्वेविरुद्ध स्पेनने दोन गोल केले. त्यामुळे दुबळ्या ताहितीविरुद्ध स्पेन गोल्सचा दुहेरी आकडा गाठण्याची शक्यता आहे. कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा अनुभव गाठीशी नसलेल्या ताहितीने नायजेरियाविरुद्ध एक गोल लगावल्यामुळे त्यांची स्वारी भलतीच खूश आहे.
आजचे सामने
स्पेन वि. ताहिती (रात्री १२.३० वा.)
नायजेरिया वि. उरुग्वे (रात्री ३.३० वा.)
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स, ईएसपीएन एचडी.