चंद्रपूरच्या नीलेश बोढेने मागील वर्षीच्या कामगिरीची पुनरावृत्ती करत येथे मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या वतीने आयोजित पाचव्या ‘मविप्र राज्यस्तरीय मॅरेथॉन’ स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा विजेता होण्याचा मान मिळविला. महिलांच्या अर्ध मॅरेथॉनमध्ये अपेक्षेप्रमाणे यजमान नाशिकच्या मोनिका आथरेने पहिला क्रमांक मिळविला. विजेत्यांना लंडन ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेता कुस्तीपटू सुशीलकुमार यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
‘रन फॉर हेल्थ अ‍ॅण्ड बिल्ड द नेशन’ हे ब्रीद असलेल्या या स्पर्धेत एकूण दोन हजार ७५९ स्पर्धक सहभागी झाले होते. नीलेश बोढेने याच स्पर्धेतील आपल्या मागील कामगिरीपेक्षा दोन मिनिटांची जादा वेळ नोंदवत (२:३१:०२) प्रथम क्रमांक मिळविला. त्यास ५१ हजार रूपये रोख व चषक प्रदान करण्यात आला. नाशिकचा गोवर्धन माळी व्दितीय तर अहमदनगरच्या दत्तात्रय जायभावेने तिसरा क्रमांक मिळविला. पहिल्या दोन मॅरेथॉनमधील विजेता मुंबईचा ब्रिजलाल बिंड या स्पर्धेत दहाव्या क्रमांकावर फेकला गेला. महिलांच्या अर्ध मॅरेथॉनमध्ये नाशिकच्या मोनिका आथरेने १:२२:३८ अशी वेळ देत विजेतेपद मिळविले. वाशिमची सविता ठोके व्दितीय तर नाशिकची मंजू सहानी तृतीय आली. विजेत्यांना चंदन, औदुंबर, कडूलिंब, तुळस आणि बेल यांचा समावेश असलेला मुकूट प्रदान करण्यात आला. १४ विविध गटातील विजेत्यांना एकूण तीन लाख, २३ हजार ६०० रूपयांची पारितोषिके देण्यात आली. सुशीलकुमार, वनाधिपती विनायकदादा पाटील, मोनिका आथरे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
क्रीडा क्षेत्रातही मुलांना भविष्य-सुशीलकुमार
आतापर्यंत क्रीडा क्षेत्रात भविष्य नाही असे म्हटले जात होते. परंतु आता या क्षेत्रातही कारकिर्द करता येऊ शकते. त्यामुळे पालकांनी मुलांना कोणत का असेना खेळ शिकवावा, असे आवाहन लंडन ऑलिम्पिक मधील रौप्यपदक विजेते कुस्तीपटू सुशीलकुमार यांनी केले. नाशिक येथील मविप्र राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना सुशीलकुमार यांनी हरियाणा सरकारने अलिकडेच २८ खेळाडूंची पोलीस अधीक्षक म्हणून भरती केल्याचेही उदाहरण दिले. परिश्रमाशिवाय यश नसल्याने युवकांनी कोणत्याही प्रकारच्या ‘शॉर्टकट’च्या मार्गाने जाऊ नये. खेळ हा शरीरासाठी आवश्यक झाला असून नियमित खेळल्यास आपणास डॉक्टरांची गरज भासणार नाही, असा सल्लाही त्यांनी दिला. या वेळी त्यांनी नाशिकची धावपटू मोनिका आथरेच्या यशाचा विशेष उल्लेख केला. आपण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहात असलेल्या बऱ्याच स्पर्धामध्ये मोनिकाच विजेती राहात असल्याचे त्यांनी नमूद केले.  

Story img Loader