सहकारी खेळाडू आणि प्रशिक्षकांची परस्परविरोधी विधाने
घरच्या मैदानावर दबंग दिल्लीच्या पराभवाचे सत्र कायम आहे. त्यामुळे ‘अ’ गटात त्यांचे स्थान तळालाच आहे आणि पुढील पल्ला गाठण्यासाठीचा त्यांचा मार्ग अधिक खडतर झाला आहे. घरच्या मैदानावर सुरुवातीपासूनच दिल्लीने विजयासाठी प्रयत्न करणे अपेक्षित होते, परंतु त्यांनी प्रमुख खेळाडू नीलेश शिंदेला विश्रांती देत सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्याबाबत सहकारी खेळाडू, प्रशिक्षक आणि स्वत: नीलेश यांच्या बोलण्यात फरक जाणवला.
पुणेरी पलटणविरुद्धच्या लढतीनंतर दुखापतीबाबत वारंवार विचारले असता नीलेश म्हणाला, ‘‘डाव्या पायाचे स्नायू ताणले गेल्यामुळे मला विश्रांती देण्यात आली होती, मात्र आता मी पूर्णपणे तंदुरुस्त आहे.’’ नीलेशने हे मत मांडले असले तरी त्याच्या चेहऱ्यावरील भाव वेगळेच काही सांगत होते. ‘‘तसे काही नाही. इतर खेळाडूंना संधी देण्याची आमची रणनीती होती,’’ असे सुरुवातीला त्याने सांगितले.
या दौऱ्यातील यू मुंबाविरुद्धच्या लढतीनंतर दिल्लीचा बचावपटू बाजीराव होडगेने दिलेल्या माहितीनंतर नीलेशच्या दुखापतीमागील घोळ अधिक वाढला. नीलेशचे स्नायू ताणले गेले आहेत, त्याला जागेवरून हलताही येत नाही, असे होडगेने सांगितले होते. मात्र दुसऱ्याच दिवशी नीलेश मैदानावर उतरला. तत्पूर्वी यू मुंबाविरुद्धच्या लढतीच्या पूर्वसंध्येला दिल्लीचे प्रशिक्षक रमेश भेंडिगिरी यांनी आमचे सर्व खेळाडू पुर्णपणे तंदुरुस्त असल्याचे सांगितले होते. या परस्परविरोधी विधानाबाबत विचारल्यानंतर आपण खरेच दुखापतग्रस्त होतो, हे पटवून देण्याचा केविलवाणा प्रयत्न नीलेशकडून झाला. ‘‘मला खरेच दुखापत झाली होती. मी शंभर टक्के तंदुरुस्त नव्हतो. विश्रांतीपूर्वीच्या सामन्यात मी १०-१५ मिनिटांनी मैदानाबाहेर जात होतो. त्यामुळे मला विश्रांती देण्यात आली,’’ असे नीलेशने सांगितले. मात्र होडगेच्या प्रतिक्रियेवर उत्तर देण्याचे त्याने जाणीवपूर्वक टाळले.
यू मुंबा आणि पुणेरी पलटण यांच्याविरुद्धच्या लढतीत आघाडीवर असताना अखेरच्या दहा मिनिटांतील ढिसाळ खेळामुळे दिल्लीला पराभव पत्करावा लागला होता. त्याबाबत नीलेशनेही अप्रत्यक्षरीत्या नाराजी व्यक्त केली. तो म्हणाला, ‘‘अखेरच्या मिनिटांत आमच्याकडून वारंवार चुका होत आहेत. बचावपटू आणि चढाईपटूंना अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे. या स्पध्रेतील आव्हान कायम राखण्यासाठी आता पुढील लढती जिंकाव्याच लागतील. घरच्या प्रेक्षकांना निराश करणार नाही.’’