संदीप कदम
मुंबई : घरामध्ये खेळांची कोणतीही पार्श्वभूमी नसतानाही निरमाबेन ठाकोरने लांब पल्ल्यांच्या शर्यतीत कारकीर्द घडवण्याचे स्वप्न पाहिले. रविवारी झालेल्या मुंबई मॅरेथॉनमध्ये तिने प्रथम स्थान पटकावत सर्वाचे लक्ष वेधले. अनेक अडचणींवर मात करत निरमाबेन आज यशस्वी अॅथलीट आहे. तिचा इथवरचा प्रवास अभूतपूर्व असाच होता.
‘‘गुजरातमध्ये मी सराव करत असताना माझी कामगिरी समाधानकारक होत नव्हती. त्यावेळी माझ्या प्रशिक्षकांनी बाहेर जाऊन प्रशिक्षण घेण्यास सांगितले. मग, मी नाशिकमध्ये सराव करू लागले. तेथील वातावरणात माझ्या कामगिरीत सुधारणा पाहायला मिळाली. गेल्या तीन वर्षांपासून मी नाशिकमध्येच सराव करत आहे,’’ असे निरमाबेनने नमूद केले.
हेही वाचा >>>Team India : मैदानात प्रभू श्रीरामाची मुद्रा! इंग्लंड लायन्सविरुद्ध शतक झळकावल्यानंतर केएस भरतचे अनोखे सेलिब्रेशन
‘‘मी यापूर्वीही पळायचे, पण त्यावेळी धावण्याला फार गंभीरपणे मी घेतले नव्हते. यानंतर मी गांभीर्याने सराव केला व माझी कामगिरी उंचावली. मग, मी सातत्याने सरावावर अधिक भर दिला. मी केनियाहून आल्यानंतर नाशिकमध्ये सराव केला व त्यानंतर पुणे मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले. तेथून माझा आत्मविश्वास दुणावला. या मॅरेथॉनमध्ये ३ तास ७ मिनिटे वेळेची नोंद केली. मग झालेल्या २०२१मध्ये मी इंद्रा मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये २ तास ५० मिनिटे अशी वेळ नोंदवली आणि या कामगिरीमुळे मला आणखी प्रोत्साहन मिळाले. मुंबई मॅरेथॉनमध्ये धावताना मला ‘पेसर’मुळे बराच फायदा झाला,’’ असे निरमाबेन म्हणाली.