Paris Olympic: भारतीय महिला कुस्तीपटू निशा दहिया हिने शुक्रवारी जागतिक ऑलिम्पिक खेळ पात्रता फेरीदरम्यान पॅरिस ऑलिम्पिकसाठी देशाला कोटा मिळवून दिला आहे. या वर्षी जुलै-ऑगस्टमध्ये होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी कोटा मिळविणारी निशा ही पाचवी भारतीय महिला कुस्तीपटू ठरली आहे. निशाने ६८ किलो वजनी गटात अंतिम फेरी गाठली आहे. निशाने उपांत्य फेरीत रोमानियाच्या अलेक्झांड्रा उंघेलचा ८-४ असा पराभव केला. त्यामुळे कुस्तीपटू निशा दहिया ही भारतासाठी महिला कुस्तीमधील पाचवा पॅरिस ऑलिम्पिक कोटा जिंकणारी पहिली कुस्तीपटू ठरली आहे, जी भारतासाठी एक ऐतिहासिक कामगिरी आहे.
निशाची चमकदार कामगिरी
सहाही ग्रीको-रोमन कुस्तीपटूंच्या निराशाजनक कामगिरीच्या एका दिवसानंतर निशा दहियाने पाचव्या पॅरिस कोटा मिळविण्याच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या. निशाने बेलारूसच्या युवा अलिना शोचुकचा ३-० असा पराभव करीत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. त्यानंतर या २५ वर्षीय कुस्तीपटूने अनेक युरोपियन चॅम्पियनशिप पदकविजेत्या चेक प्रजासत्ताकच्या ॲडेला हॅन्झलिकोव्हाचा ७-४ असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला होता.
मानसीचा पराभव
मानसी (६२ किलो) उप-उपांत्यपूर्व फेरीमध्ये बेलारूसची प्रतिस्पर्धी वेरानिका इवानोव्हा हिच्याकडून पराभूत झाली. पण, ती रेपेचेजमधून कास्यपदकाच्या फेरीत प्रवेश करू शकते आणि त्याद्वारे ऑलिम्पिक कोटा जिंकण्याची आशा जिवंत ठेवू शकते. परंतु, त्यासाठी वेरानिकाला अंतिम फेरी गाठावी लागेल. भारतातील चार महिला कुस्तीपटूंनी आधीच ऑलिम्पिक कोटा मिळविला आहे. त्यामध्ये विनेश फोगट (५० किलो), आखरी पंघल (५३ किलो), अंशू मलिक (५७ किलो) व रितिका हुडा (७६ किलो) यांचा समावेश आहे.