IND vs AUS Nitish Kumar Reddy’s father gets emotional after his century video viral : भारतीय संघाचा युवा अष्टपैलू खेळाडू नितीश कुमार रेड्डी याने पहिले कसोटी शतक झळकावले आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर त्याने १७१ चेंडूत शतक झळकावले. या मालिकेतील पहिल्या सामन्यातून रेड्डीने भारताकडून कसोटी पदार्पण केले. त्याने सर्व सामन्यांमध्ये चांगली फलंदाजी केली परंतु येथे त्याने आठव्या क्रमांकावर येऊन शतक झळकावले. नितीशच्या पहिल्यावहिल्या शतकानंतर त्याच्या वडिलांच्या आनंदाला पारावार उरला नाही. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नितीश कुमार रेड्डीने चौकार मारून शतक पूर्ण केले. ९९ च्या धावांवर असताना त्याने स्कॉट बोलंडच्या चेंडू सीमारेषेबाहेर पाठवला. तो ९९ धावांवर असताना नववी विकेट पडली होती. यानंतर सिराजने आपली विकेट टिकवून नितीश शतक पूर्ण करण्यात मदत केली. रेड्डी क्रीजवर आला तेव्हा भारताची धावसंख्या ६ विकेट्सवर १९६ धावा होती. यानंतर त्याने १७३ चेंडूचा सामना करताना १० चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने पहिलंवहिलं शतक पूर्ण केलं.
नितीशच्या शतकानंतर वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू-
नितीश कुमार रेड्डी यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांचे वडील मुत्याला रेड्डीही मेलबर्नला पोहोचले होते. ते स्टेडियममध्येच उपस्थित होते. शतकापूर्वी, कॅमेरे सतत मुत्यालावर लक्ष केंद्रित करत होते आणि ते खूपच चिंतेत असलेले दिसत होते. जेव्हा नितीश कुमार रेड्डीने चौकारांसह शतक पूर्ण केले तेव्हा त्यांचे वडील भावूक झाले. त्यांनी हात जोडून आकाशाकडे पाहिले. यावेळी ते भावूक झाले आणि त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू डोळ्यात तरळले. त्यावेळी नितीशचे काकाही वडिलांसोबत एमसीजीमध्ये उपस्थित होते. ज्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
हेही वाचा – Nitish Kumar Reddy : नितीश रेड्डीची मेलबर्नमध्ये कमाल! पहिलंवहिलं शतक झळकावत मोडला ७६ वर्षांपूर्वीचा विक्रम
भारत अजूनही ११६ धावांनी मागे –
खराब प्रकाशामुळे तिसऱ्या दिवशीचा खेळ लवकर थांबवण्यात आला. खेळ थांबला तोपर्यंत भारताने पहिल्या डावात नऊ गडी गमावून ३५८ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४७४ धावा केल्या होत्या. या बाबतीत भारत अजूनही ११६ धावांनी मागे आहे. नितीश रेड्डीने उत्कृष्ट शतक झळकावले. तो सध्या १०५ धावांवर नाबाद आहे. आतापर्यंत १७६ चेंडूंच्या खेळीत त्याने १० चौकार आणि एक षटकार मारला आहे. मोहम्मद सिराजही दोन धावांवर नाबाद आहे.