Nitish Kumar Reddy Maiden Test Hundred: भारतीय संघाचा तारणहार ठरलेल्या नितीश रेड्डीने उत्कृष्ट फलंदाजी करत नितीश रेड्डीने आपले पहिले कसोटी शतक झळकावले आहे. नितीश रेड्डीने 99 धावांवर असताना बोलँडच्या गोलंदाजीवर दणदणीत चौकार लगावत आपलं कसोटी शतक पूर्ण केलं. नितीश रेड्डीने १७३ चेंडूत १० चौकार आणि एका षटकारासह १०३ धावांची अद्वितीय खेळी केली. नितीश रेड्डीचं शतक पूर्ण होताच त्याच्या वडिलांनी एकच जल्लोष केला आणि त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते.
नितीश रेड्डी ९७ धावांवर असताना वॉशिंग्टन सुंदर बाद झाला. यानंतर मैदानात आलेला जसप्रीत बुमराह २ चेंडू खेळत बाद झाल्याने ८वी विकेट पडली. यानंतर मोहम्मद सिराज मैदानावर आला. मोहम्मद सिराज किती चेंडू खेळू शकेल, याची सर्वांनाच चिंता होती. पण सिराजने बचावात्मक फलंदाजी करत कमिन्सचं षटक खेळून काढलं आणि पुढच्या षटकात नितीश रेड्डीला स्ट्राईक दिली. नितीश रेड्डीने एक डॉट बॉल खेळत पुढच्या चेंडूवर चौकार लगावत शतकाचं स्वप्न पूर्ण केलं.
हेही वाचा – IND vs AUS: नितीश रेड्डीचा दुर्मिळ विक्रम, ऑस्ट्रेलियाविरूद्ध ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच भारतीय फलंदाज
२१ वर्षीय नितीश रेड्डीच्या शतकामुळे भारताने चांगली धावसंख्या उभारली आहे. नितीश रेड्डीने वॉशिंग्टन सुंदरबरोबर १२७ धावांची मोठी भागीदारी रचली. सुंदर आणि नितीश रेड्डीची ही ८व्या विकेटसाठी ऑस्ट्रेलियाविरूद्ध भारताची दुसरी सर्वात मोठी भागीदारी आहे. वॉशिंग्टन सुंदरनेही नितीशच्या जोडीने अर्धशतक पूर्ण केले.
मेलबर्न कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने १५९धावांवर ५ विकेट गमावल्या. तिसऱ्या दिवसाची सुरुवातही चांगली झाली नाही. पहिल्या सत्रात भारताने महत्त्वाच्या विकेट गमावल्या. १९१ धावांवर ऋषभ पंत खराब शॉट खेळून बाद झाला, यानंतर जडेजालाही नाथन लायनने बाद करवत तिसऱ्या दिवशी भारताला धक्का दिला. यानंतर मैदानावर आलेल्या नितीश रेड्डीने भारताचा डाव उचलून धरला. पहिल्यांदा त्याने वॉशिंग्टन सुंदरबरोबर चांगली भागदारी रचत आणि बचावात्मक तसेच संधी मिळताच आक्रमक फटके खेळत भारताचा फॉलोऑन वाचवला. यानंतर रेड्डीने आपले अर्धशतक पूर्ण केले.
नितीश रेड्डीचं ऐतिहासिक शतक
नितीश कुमार रेड्डी बॉक्सिंग डे कसोटीत शतक झळकावणारा सर्वात तरुण भारतीय ठरला आहे. नितीशने वयाच्या २१ वर्षे २१६ दिवसात ही कामगिरी केली आहे. याआधी कार्ल हूपरने वयाच्या २१ व्या वर्षी ०११ दिवसांत बॉक्सिंग डे कसोटीत शतक झळकावले होते.