IND vs AUS 4th Test Day 3 Updates in Marathi: नितीश रेड्डीने बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. ३ वेळा आपल्या पहिल्या कसोटी अर्धशतकापासून हुकल्यानंतर मेलबर्न कसोटीत अगदी मोक्याच्या क्षणी त्याने आपली शानदार कामगिरी करत पहिले अर्धशतक पूर्ण केले. मेलबर्न कसोटीच्या तिसऱ्या दिवशी जेव्हा तो फलंदाजीसाठी आला तेव्हा टीम इंडियाने १९१ धावांवर ६ विकेट गमावल्या होत्या. पण लंच ब्रेकपर्यंत त्याने वॉशिंग्टनच्या साथीने टीम इंडियाची धावसंख्या २४४ धावांपर्यंत नेण्यात यश मिळवले. यादरम्यान त्याने षटकारांचा खास विक्रमही आपल्या नावावर केला.
मेलबर्न कसोटीच्या तिसऱ्या दिवशी नितीश रेड्डीने आपले अर्धशतक पूर्ण केले. नितीश रेड्डी लंचब्रेक पर्यंत ८ चौकार आणि एका षटकारासह ८५ धावांवर खेळत आहे. या डावातील त्याचा हा षटकार खूपच खास ठरला. कारण या मालिकेतील त्याचा हा आठवा षटकार होता. यासह त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्या घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत लगावलेल्या सर्वाधिक षटकारांची बरोबरी केली. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियात कसोटी मालिकेत ८ षटकार लगावणारा नितीश कुमार रेड्डी हा भारताचा पहिला फलंदाज आहे.
नितीश कुमार रेड्डीच्या आधी ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्या मायदेशात कसोटी मालिकेत केवळ दोनच फलंदाज इतके षटकार लगावण्यात यशस्वी ठरले आहेत. २००२-०३ च्या ॲशेस मालिकेत मायकेल वॉनने ८ षटकार लगावले होते. त्याचवेळी ख्रिस गेलने २००९-१० च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात एका कसोटी मालिकेत इतके षटकार मारले होते. आता नितीशकुमार रेड्डीने हा पराक्रम केला आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्ध इतके षटकार लगावणारा नितीश रेड्डी हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. नितीशकुमार रेड्डीला आता या यादीत आघाडीवर राहण्याची संधी आहे. या डावात तो या दोन्ही महान खेळाडूंना मागे टाकू शकतो.
नितीश कुमार रेड्डी यांनी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२४-२५ मध्ये आतापर्यंत २०० हून अधिक धावा केल्या आहेत. या मालिकेत २०० धावांचा टप्पा गाठणारा तो तिसरा भारतीय ठरला आहे. त्याच्याशिवाय केवळ यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल यांनी २००+ धावा केल्या आहेत. आता मेलबर्न कसोटीत नितीश रेड्डी त्याच्या पहिल्या कसोटी शतकाच्या जवळ पोहोचला आहे.