Nitish Reddy First Test Century in IND vs AUS 4th Test : मेलबर्न येथील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटीत अष्टपैलू नितीश कुमार रेड्डीने कहर केला. शनिवारी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी आठव्या क्रमांकावर आल्यावर त्याने शानदार शतक झळकावले. ऐतिहासिक मेलबर्न क्रिकेट ग्राउंड (एमसीजी) येथे खेळल्या जात असलेल्या बॉक्सिंग डे कसोटीत त्याने कमालीचे धैर्य दाखवले. त्याने १७१ चेंडूत आपले शतक पूर्ण करत ७६ वर्षांपूर्वीचा एक खास विक्रम मोडला.
नितीश कुमराने ११५ व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर चौकार मारून आपले शतक पूर्ण करत एक मोठा पराक्रम केला. तो ऑस्ट्रेलियात पहिले कसोटी शतक झळकावणारा तिसरा सर्वात तरुण भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याने ७६ वर्षे जुना विक्रम मोडला आहे. नितीशने वयाच्या २१ वर्षे २१६ दिवसांत ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर शतक झळकावण्याचा पराक्रम केला.
१९४८ मध्ये ॲडलेडमध्ये वयाच्या २२ व्या वर्षी ४६ दिवसांत कसोटी शतक झळकावणाऱ्या दत्तू फडकरला त्याने मागे टाकले. नितीशपेक्षा वयाने लहान असलेल्या दोनच खेळाडूंनी आठव्या किंवा त्याखालील क्रमांकावर फलंदाजी करताना शतके झळकावली आहेत. या यादीत बांगलादेशचा अबुल हसन (२० वर्षे १०८ दिवस) आणि भारताचा अजय रात्र (२० वर्षे १५० दिवस) यांची नावे आहेत.
ऑस्ट्रेलियात पहिले कसोटी शतक झळकावणारे सर्वात तरुण भारतीय खेळाडू –
१८ वर्षे २५६ दिवस – सचिन तेंडुलकर, सिडनी १९९२
२१ वर्षे ९२ दिवस – ऋषभ पंत, सिडनी २०१९
२१ वर्षे २१६ दिवस – नितीश रेड्डी, मेलबर्न २०२४
२२ वर्षे ४६ दिवस – दत्तू फडकर, ॲडलेड १९४८
हेही वाचा – IND vs AUS: नितीश रेड्डीचा दुर्मिळ विक्रम, ऑस्ट्रेलियाविरूद्ध ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच भारतीय फलंदाज
खराब प्रकाशामुळे तिसऱ्या दिवशीचा खेळ लवकर थांबवण्यात आला. खेळ थांबला तोपर्यंत भारताने पहिल्या डावात नऊ गडी गमावून ३५८ धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४७४ धावा केल्या होत्या. या बाबतीत भारत अजूनही ११६ धावांनी मागे आहे. नितीश रेड्डीने उत्कृष्ट शतक झळकावले. तो सध्या १०५ धावांवर नाबाद आहे. आतापर्यंत १७६ चेंडूंच्या खेळीत त्याने १० चौकार आणि एक षटकार मारला आहे. मोहम्मद सिराजही दोन धावांवर नाबाद आहे.