रविवारी इंडियन प्रीमियर लिगच्या झालेल्या तिसऱ्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने सनरायजर्स हैदराबादवर १० धावांनी विजय साकारला. कोलकाताचे १८८ धावांचे आव्हान पार करताना हैदराबादला २० षटकांत ७ बाद १७७ धावांपर्यंतच मजल मारता आली. कोलकात्याच्या विजयाचा शिल्पकार ठरला तो म्हणजे नितीश राणा.
राणाने आपल्या ५६ चेंडूत ८० धावांच्या खेळीमध्ये ९ चौकार आणि चार षटकारांची बरसात केली. पण सोशल मीडियामध्ये मात्र केकेआरच्या विजयापेक्षा आणि राणाच्या शानदार खेळीपेक्षा नितीश राणाने अर्धशतक झळकावल्यानंतर केलेल्या हटके सेलिब्रेशनची चांगलीच चर्चा रंगली आहे. ३७ व्या चेंडूवर राणाने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. पण अर्धशतकानंतर त्याने डगआऊटच्या दिशेने पाहून बॅट दाखवत आपल्या उजव्या हातातील अंगठी सर्वांना दाखवली. त्यानंतर त्याच्या या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनची चांगलीच चर्चा सुरू झाली. राणाने जर्मनीचा फुटबॉलपटू मेसुट ओजिलचं सेलिब्रेशन कॉपी केल्याची चर्चा सुरू झाली. मात्र, सामना संपल्यानंतर हरभजन सिंहसोबत बोलताना राणाने स्वतःच त्या सेलिब्रेशनमागचं कारण सांगितलं. “ते सेलिब्रेशन माझ्या सर्व मित्रांसाठी होतं. कारण आमच्या मित्रांच्या ग्रुपमध्ये सर्वांना ‘ब्राउन मुंडे’ हे गाणं आवडतं”, असं राणाने सांगितलं. नंतर हरभजनने त्याला हे गाणं गायला सांगितलं. त्यावर दोघांनी मिळून ब्राउन मुंडे गाणं गात प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. ही व्हिडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Talk about being on song @28anand gets @harbhajan_singh & @NitishRana_27 rapping post @KKRiders‘ win over #SRH. #VIVOIPL #SRHvKKR @Vivo_India
Watch the full interview https://t.co/9hAW2yvm0H pic.twitter.com/DlL6osKbfY
— IndianPremierLeague (@IPL) April 12, 2021
दरम्यान, ८० धावांवर असताना फिरकीपटू मोहम्मद नबीने राणाला विजय शंकरकडे झेल द्यायला भाग पाडलं. सलामीवीर नितीश राणाचे अर्धशतक आणि गोलंदाजांनी केलेल्या अप्रतिम कामगिरीमुळे कोलकाता नाइट रायडर्सने इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) रविवारी सनरायजर्स हैदराबादवर १० धावांनी विजय साकारला. राणा आणि राहुल त्रिपाठी यांनी साकारलेल्या दमदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर कोलकाता नाइट रायडर्सने ६ बाद १८७ अशी सन्मानजनक धावसंख्या उभारली होती. कोलकाताचे १८८ धावांचे आव्हान पार करताना हैदराबादला २० षटकांत ७ बाद १७७ धावांपर्यंतच मजल मारता आली.
संक्षिप्त धावफलक :
कोलकाता नाइट रायडर्स : २० षटकांत ६ बाद १८७ (नितीश राणा ८०, राहुल त्रिपाठी ५३, दिनेश कार्तिक नाबाद २२; राशिद खान २/२४, मोहम्मद नबी २/३२) विजयी वि. सनरायजर्स हैदराबाद : २० षटकांत ५ बाद १७७ (मनीष पांडे नाबाद ६१, जॉनी बेअरस्टो ५५; प्रसिध कृष्णा २/३५).