Nitish Reddy climbs Tirupati Temple stairs on knees: भारताचा युवा फलंदाज नितीश रेड्डीला ऑस्ट्रेलियाविरूद्ध पहिल्याच दौऱ्यावर कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. नितीशने या संधीचं सोन करत प्रत्येक प्रसंगी संघासाठी महत्त्वपूर्ण खेळी केली. नितीशच्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमधील शतकाने सर्वांचंच लक्ष वेधलं होतं. संपूर्ण भारतासाठी त्याचं हे शतक भावुक करणारं होतं. याचबरोबर कसोटी क्रिकेटमधील नितीशचं हे पहिलं शतक होतं आणि संघासाठी सर्वात मोक्याच्या क्षणी त्याने शतकी कामगिरी केली होती. यानंतर आता नितीश रेड्डीने देवाचे आभार मानले आहेत.
नितीशने मेलबर्न कसोटीत शतक झळकावले होते. यासह त्याने पाच कसोटी सामन्यात ३७.२५ च्या सरासरीने २९८ धावा केल्या. या युवा फलंदाजाच्या कामगिरीने अनुभवी खेळाडू चांगलेच प्रभावित झाले. सोशल मीडियावरही चाहत्यांनी नितीशच्या कामगिरीचे कौतुक केले. ऑस्ट्रेलियाहून परतताच नितीश रेड्डीची बीसीसीआयने इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी संघात निवड केली. यासह आता नितीश देवाचे आभार मानण्यासाठी तिरूपतीला पोहोचला.
नितीशने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तो तिरूपती मंदिराच्या पायऱ्या गुडघ्याने चढताना दिसत आहे. नितीश रेड्डी देवाचे आभार मानण्यासाठी गुडघ्याने या पायऱ्या चढत गेला. नितीश रेड्डीचा हा व्हीडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. आपल्या पदार्पणाच्य कसोटी मालिकेत उत्कृष्ट कामगिरी करत त्याने जगभरात आपली ओळख निर्माण केली आहे.
नितीश रेड्डी ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर मायदेशात परतताच एअरपोर्टवर त्याचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. नितीशवर पिवळ्या फुलांचा वर्षाव करत त्याला मोठा हार घालण्यात आला. त्यानंतर जीपमध्ये तो त्याच्या वडिलांसह बसून त्याच्या राहत्या घरी म्हणजेच विशाखापट्टणममधील गजुवाका येथे पोहोचला. त्याच्या या संपूर्ण प्रवासात चाहत्यांचा जल्लोष पाहायला मिळाला.
नितीश रेड्डी हा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारताला मिळालेला एक महत्त्वपूर्ण अष्टपैलू खेळाडू आहे. जो फलंदाजीसह वेगवान गोलंदाजीही करू शकतो. नितीश रेड्डी आगामी मालिकांमध्ये आणि स्पर्धांमध्ये भारतासाठी गेमचेंजर खेळाडू ठरू शकतो.
नितीश कुमार रेड्डी यांनी आतापर्यंत पाच कसोटी सामने खेळले आहेत. या ५ सामन्यांमध्ये त्याने २९८ धावा केल्या आहेत आणि एक शतकही झळकावले आहे. त्याने आतापर्यंत तीन टी-२० आंतरराष्ट्रीय सामनेही खेळले आहेत. त्याने तीन सामन्यांत ४५.० च्या सरासरीने ९० धावा केल्या आहेत. नितीश रेड्डी आयपीएलमध्ये सनराझर्स हैदराबादकडून खेळतो आणि आयपीएल २०२४ मधील त्याची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे.