ब्राझीलचा आघाडीचा फुटबॉलपटू नेयमार डा सिल्वाला झालेल्या दुखापतीमुळे विश्वचषकातून त्याला माघार घ्यावी लागली. नेयमारच्या दुखापतीला कारणीभूत ठरलेला कोलंबियाचा बचावपटू ज्युआन कॅमिलो झुनिगावर पूर्वलक्षी प्रभावाचा ठपका ठेवून कडक कारवाई करण्यात यावी, ही ब्राझील फुटबॉल महासंघाची मागणी फिफाच्या शिस्तपालन समितीच्या प्रमुखांनी फेटाळून लावली आहे.
या घटनेमुळे नेयमारला गंभीर स्वरूपाची दुखापत झाल्याबद्दल शिस्तपालन समितीने चिंता प्रकट केली. शुक्रवारी ब्राझील आणि कोलंबिया यांच्यात झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यातील ही घटना सामनाधिकाऱ्यांनी पाहिली आहे. त्यामुळे झुनिगावर कारवाई करता येणार नाही.
नेयमारच्या पाठीच्या मणक्याला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली असून, त्यामुळे त्याला विश्वचषक स्पध्रेतील उर्वरित सामन्यांना मुकावे लागणार आहे. याबाबत शिस्तपालन समितीने म्हटले आहे की, ‘‘नेयमार लवकर बरा व्हावा, यासाठी आमच्या शुभेच्छा. याचप्रमाणे दुखापतींमुळे विश्वचषक स्पध्रेतून माघार घ्यावी लागलेल्या सर्व खेळाडूंनाही लवकर बरे होण्यासाठी आमच्या शुभेच्छा असतील.’’
नेयमारला दुखापत व्हावी, या हेतूने आपण कोणतेही कृत्य केले नाही, अशा शब्दांत झुनिगाने दिलगिरी प्रकट केली आहे. फोर्टालेझा येथे घडलेल्या या घटनेनंतर सामनाधिकाऱ्यांबाबत ब्राझीलमध्ये तीव्र नाराजी प्रकट करण्यात आली. स्पॅनिश रेफ्री कार्लोस व्हेलास्को कार्बालो यांच्यावरसुद्धा काही समालोचकांनी टीका केली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा