संयुक्त अरब अमिराती(यूएई) मधील खासगी टी-२० लीग सुरू करण्यामागे कोणत्याही स्वरूपाचा पाठिंबा नसल्याचे स्पष्टीकरण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने(बीसीसीआय) दिले आहे.
भारताचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि अष्टपैलू सुरेश रैना हे दोन क्रिकेटपटू अरबमध्ये ही टी-२० सामन्यांची स्पर्धा सुरू करणार असल्याची चर्चा होती. त्यातूनच बीसीसीआयनेही याला पाठिंबा दिल्याचे सांगण्यात येत होते. अखेर बीसीसीआयचे सचिन संजय पटेल यांनी यासंबंधिचे पत्रक जारी केले असून या लीगमागे बीसीसीआयने कोणतीही भूमिका मांडलेली नाही आणि त्यास कोणत्याही प्रकारे पाठिंबा दर्शविलेला नाही.
संजय पटेल म्हणाले की, “चर्चा सुरू असलेल्या त्या लीगशी बीसीसीआयचा कोणताही संबंध नाही आणि मूळात आयसीसीनेही अरब क्रिकेट असोसिएशने अशा प्रकारच्या कोणत्याही लीगला परवानगी दिली नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे प्रश्नच निर्माण होत नाही. बीसीसीआयचा या लीगला पाठिंबा असल्याच्या चर्चा खोट्या आहेत.”