Team India Returns from Dubai: गेल्या वर्षी वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियानं सर्व संघांना नमवत विजेतेपदावर आपलं नाव कोरलं होतं. या विश्वविजयानंतर मायदेशी परतलेल्या टीम इंडियाचं जोरदार स्वागत करण्यात आलं होतं. शिवाय मरीन ड्राईव्हवर विजयी मिरवणूक आणि वानखेडे स्टेडियमवर जंगी सत्कार सोहळादेखील आयोजित करण्यात आला होता. यंदा मात्र चॅम्पियन्स ट्रॉफीवर तब्बल १२ वर्षांनंतर भारताचं नाव कोरलं गेल्यानंतरदेखील भारतीय संघातले सर्व खेळाडू वेगवेगळ्या मार्गांनी भारतात परतत आहेत. त्यांच्यासाठी ना स्वागत समारंभ केले जात आहेत ना त्यांची मिरवणूक काढली जात आहे. पण असं का घडतंय?

२००७ साली धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकलेल्या पहिल्या टी-२० विश्वचषकानंतर तब्बल १६ वर्षांनी भारतानं पुन्हा एकदा या चषकावर नाव कोरलं होतं. भारतीय संघ मायदेशी परतल्यानंतर मोठ्या जल्लोषात त्यांचं स्वागत करण्यात आलं होतं. मरीन ड्राईव्हवर टीम इंडियाची काढलेली विजयी मिरवणूक ३ ते ४ तास चालली होती. या मिरवणुकीत आपल्या विश्वविजयी संघावर क्रिकेटचाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव केला गेला. यंदा मात्र चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स अर्थात चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेते ठरल्यानंतरदेखील यातलं काहीही करण्यात येत नसल्याचं दिसून येत आहे.

IPL मुळे क्रिकेटपटूंच्या कौतुकाला फाटा!

टीम इंडियानं चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून आणली असली, तरी अवघ्या आठवड्याभरात IPL अर्थात इंडियन प्रिमियम लीगचा थरार भारतात रंगणार आहे. आयपीएलमधील काही संघ आधीच आपापल्या सामन्यांच्या ठिकाणी पोहोचले असून त्यांचा सरावदेखील सुरू झाला आहे. काही संघाचे खेळाडू अजूनही आपापल्या देशातून भारतात दाखल होणं बाकी आहे. अशात टीम इंडियामध्ये काही संघांचे कर्णधार तर काही संघांमधले महत्त्वाचे खेळाडू असून त्यांना आपापल्या आयपीएल संघांसोबत पुढच्या स्पर्धेच्या तयारीसाठी अगदीच कमी वेळ मिळत असल्याने यंदाच्या कौतुक सोहळ्यांना फाटा देण्यात आल्याचं बोललं जात आहे.

येत्या २२ मार्चपासून आयपीएलच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर दुबईतून चॅम्पियन्स ट्रॉफी संपवून भारतात परतणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूंना आपापल्या आप्तस्वकीयांसोबत वेळ घालवणं आणि त्यानंतर लागलीच आयपीएलच्या सरावासाठी आपापल्या संघात दाखल होणं ही तारेवरची कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे कोणत्याही कौतुकसोहळ्याशिवायच टीम इंडियातले खेळाडू भारतात परतत असून पुढील नियोजनात व्यग्र होताना दिसत आहेत.

कॅप्टन रोहित मुंबईत दाखल!

दरम्यान, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा सोमवारी संध्याकाळी मुंबईत परतला. यावेळी त्याच्या स्वागतासाठी विमानतळावर चाहत्यांची मोठी गर्दी दिसून आली. रोहितनंदेखील क्रिकेट चाहत्यांनी दाखवलेला पाठिंबा आणि प्रेमाबद्दल आभार मानले. मुलगी समायराला कडेवर घेऊन रोहित शर्मा विमानतळावरून बाहेर पडत असताना आपल्या विजयी कर्णधाराला पाहण्यासाठी क्रिकेटचाहत्यांनी मोठी गर्दी केली होती.

Story img Loader