ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेत अद्यापही पहिले चार मानांकित खेळाडूंचेच वर्चस्व राहिले आहे. युवा पिढीकडून अपेक्षेइतके आव्हान मिळत नाही अशी खंत व्यक्त केली आहे विम्बल्डन उपविजेता खेळाडू रॉजर फेडरर याने.
विम्बल्डन स्पर्धेत अग्रमानांकित नोवाक जोकोवीच याने फेडरर याला पाच सेट्सच्या लढतीनंतर पराभूत करीत अजिंक्यपद मिळविले. फेडरर याला येथे चौथे मानांकन मिळाले होते. ३२ वर्षीय खेळाडू फेडरर याने आतापर्यंत विम्बल्डनच्या सात विजेतेपदांसह सतरा ग्रँड स्लॅम अजिंक्यपदे मिळविली आहेत.
ग्रँड स्लॅम स्पर्धामध्ये जोकोवीच, अँडी मरे, रॅफेल नदाल व मी आम्हा चौघांचेच वर्चस्व राहिले आहे असे सांगून फेडरर म्हणाला, ग्रिगोर दिमित्रोव्ह, मिलोल राओनिक, केई निशिकोरी यांनी येथील स्पर्धेत काही नैपुण्यवान कामगिरी केली असली तरी म्हणावी तशी उंची युवा खेळाडूंनी गाठलेली नाही. त्यांच्याकडून आम्हास खूप धोका वाटत नाही. मी वयाच्या ३२ व्या वर्षीही ग्रँड स्लॅमच्या अंतिम फेरीत स्थान मिळवू शकतो हे लक्षात घेतल्यास युवा खेळाडूंनी अजूनही पुष्कळ मेहनत घेण्याची आवश्यकता आहे. नदालने १९ व्या वर्षी, जोकोवीच याने २० व्या वर्षी व मी २१ व्या वर्षी पहिले ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळविले होते. तशी कामगिरी निशिकोरी, राओनिक किंवा दिमित्रोव्ह यांना करता आलेली नाही.
विजेतेपदाची संधी हुकल्याबद्दल खंत व्यक्त करीत फेडरर म्हणाला, चौथ्या सेटमध्ये मॅचपॉईन्ट वाचवूनही मी त्याचे रूपांतर विजेतेपदात करू शकलो नाही याची खंत मला निश्चित वाटत आहे. ही लढत अतिशय रंगतदार झाली. मात्र नोवाक हा खरोखरीच विजेतेपदासाठी लायक खेळाडू आहे. हातातोंडाशी आलेला विजय गमावल्याचे दु:ख मला खूप वाटले. काही क्षण मी अवाक झालो. मात्र प्रेक्षकांच्या गॅलरीत माझ्या जुळ्या मुलींना पाहिल्यानंतर मी सावरलो गेलो. माझ्यासाठी माझे कुटुंब प्रेरणादायी आहे. त्यामुळेच मी पराभवाचे दु:ख न करता आगामी अमेरिकन ओपन स्पर्धेच्या तयारीवर लक्ष केंद्रित करणार आहे. गेले दोन आठवडे मी येथे केलेल्या खेळामुळे मला खूप समाधान वाटत आहे. अजूनही अव्वल दर्जाची स्पर्धा खेळण्याची क्षमता माझ्याकडे आहे हे यावरून सिद्ध झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा