भारतीय क्रिकेट संघाला पहिल्यांदा विश्वचषक जिंकवून देणारे कर्णधार कपिल देव यांनी महेंद्रसिंह धोनीचं कौतुक केलं आहे. भारतीय क्रिकेटसाठी महेंद्रसिंह धोनीने खूप मोठं योगदान दिलं असल्याचं कपिल देव म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मध्यंतरीच्या कळात धोनी आपला फॉर्म गमावून बसला होता. यावेळी अनेक माजी खेळाडूंसह सोशल मीडियावर चाहत्यांनी धोनीवर टीका करत त्याला निवृत्त होण्याचा सल्ला दिला. मात्र कपिल देव यांनी धोनीचं समर्थन केलं आहे. “मला धोनीबद्दल वेगळं वक्तव्य करण्याची गरज वाटत नाही. त्याचं भारतीय क्रिकेटसाठी योगदान मोठं आहे, आणि त्याचा आदर व्हायलाच हवा. तो अजुन किती क्रिकेट खेळेल आणि त्याचं शरीर त्याला किती साथ देईल हे कोणालाही माहिती नाही. मात्र धोनीइतकं योगदान कोणत्याही खेळाडूने देशासाठी दिलेलं नाही. विश्वचषकासाठी माझ्या त्याला शुभेच्छा आहेत.” कपिल देव IANS वृत्तसंस्थेशी बोलत होते.

सध्या सुरु असलेल्या आयपीएलच्या बाराव्या हंगामातही धोनीचा चेन्नई सुपरकिंग्ज संघ चांगल्या फॉर्मात आहे. बाद फेरीत प्रवेश करण्यासाठी धोनीच्या संघाला अवघ्या एका विजयाची आवश्यकता आहे. ३० मे पासून इंग्लंडमध्ये विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होते आहे. ५ जूनला भारताचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. त्यामुळे या स्पर्धेत धोनी कसा खेळ करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No cricketer has served india like dhoni says kapil dev