बीसीसीआयशी संलग्नित कोणत्याही खेळाडूने अनधिकृत असणाऱ्या इंडियन ज्युनिअर प्लेयर्स लीगमध्ये (आयजेपीएल) खेळू नये, अशी सूचना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने केली आहे. १९ आणि २० सप्टेबर रोजी दुबईमध्ये आयजेपीएल स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या प्रचारासाठी आयोजकांनी आयसीसीच्या मोठमोठ्या सदस्यांचा देखील वापर केलाय. विशेष म्हणजे भारतीय संघाचा सलामीवीर गौतम गंभीर या स्पर्धेचा ब्रॅड अॅम्बेसिडर आहे. याशिवाय दक्षिण आफ्रिकेचा जॉन्टी ऱ्होड्स आणि वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू केरॉन पोलार्ड देखील व्यवस्थापकीय स्टाफ म्हणून सहभागी आहेत.
बीसीसीआयचे कार्यवाहू सचिव अमिताभ चौधरी यांनी राज्य क्रिकेट संघटनेला ई-मेलच्या माध्यमातून या स्पर्धेला बीसीसीआयची मान्यता नसल्याचे सांगितले. त्यामुळे राज्य क्रिकेट संघटनेच्या अधिकृत खेळाडूने या स्पर्धेत सहभागी होऊ नये, अशी सूचना केली. इंडियन ज्युनिअर प्लेअर्स लीग आणि इंडियन ज्युनिअर प्रीमिअर लीग या दोन्ही स्पर्धांना बीसीसीआयची मान्यता नाही. त्यामुळे या स्पर्धेत सहभागी होऊ नये, असे मेलद्वारे सांगण्यात आले आहे.
बीसीसीआयच्या सूचनेचे उल्लंघन करणाऱ्या खेळाडूंसाठी भारतीय क्रिकेट मंडळाकडून आयोजित होणाऱ्या स्पर्धेचे दरवाजे कायमचे बंद होतील, असा सूचक इशारा बीसीसीआयच्या या परिपत्रानंतर एका राज्याच्या सचिवांनी दिला. ते याप्रकरणी म्हणाले की, १६ वर्षांखालील आणि १९ वर्षांखालील खेळाडूंची यादी आमच्याकडे आहे. जर यातील कोणत्याही खेळाडूने बीसीसीआयच्या सूचनेचे उल्लंघन करुन या स्पर्धेत सहभाग घेतला तर त्याचे नाव यादीतून वगळण्यात येईल. त्यानंतर या खेळाडूला बीसीसीआयच्या कोणत्याही स्पर्धेत सहभागी होता येणार नाही.
या स्पर्धेत एकूण १६ संघ सहभागी असून, यात अभिनेता अरबाज खानच्या मालकीचा मुंबई मास्टर्स आणि राजीव खंडेलवालचा राजस्थान रोअर्स संघाचा समावेश आहे. गुजरात ग्रेट्स, कोलकाता स्ट्रायकर्स, बंगळुरु स्टार्स, आसाम रेंजर्स, पुणे पँथर्स, दिल्ली डॅशर्स, रांची बुस्टर्स, पंजाब टायगर्स, डेहराडून रॉकर्स, युपी हिरोस्, हैदराबाद हॅवॉक्स, चेन्नई चॅम्पस, एमपी वॉरियर्स आणि हरयाणा हरिकेन या संघाचा समावेश आहे.