भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या नियुक्तीबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचे स्पष्टीकरण बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी सोमवारी दिले आहे. सौरव गांगुली याच्याकडे भारतीय संघाची महत्त्वाची जबाबदारी सोपविली जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून क्रिकेट वर्तुळात आहे. भारतीय संघाच्या सल्लागार समितीचा अध्यक्ष, संघाचा संचालक किंवा मुख्य प्रशिक्षक यापैकी एखाद्या महत्त्वाच्या पदावर गांगुलीची नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मात्र, याबाबत अनुराग ठाकूर म्हणाले की, “सौरव गांगुलीचे भारतीय क्रिकेटमधील योगदान महत्त्वपूर्ण राहिले आहे. सौरव उत्कृष्ट क्रिकेटपटू आहे. संघाच्या हिताच्या दृष्टीने बीसीसीआयकडून निर्णय घेतला जाईल. सौरवच्या नियुक्तीबाबत गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये चर्चा सुरू आहे मात्र, बीसीसीआयने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.”
आयपीएल संपल्यावर आता भारतीय संघ काही दिवसांमध्ये बांगलादेशच्या दौऱ्यावर जाणार आहे. पण या दौऱ्यावर जाताना भारतीय संघाचा प्रशिक्षक कोण असेल, याबाबत मात्र अजूनही निर्णय झालेला नाही. बीसीसीआय प्रशिक्षक निवडण्याच्या तयारीला लागले आहे, पण निवड होईपर्यंत संघाला बांगलादेश दौऱ्यावर अनुभवी माजी खेळाडूंबरोबर पाठवण्याचे बीसीसीआयने ठरवले आहे. त्यासाठी सौरव गांगुलीला बांगलादेश दौऱ्यावर कामगिरी उंचावण्यासाठी पाठवण्यात येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Story img Loader