आशियाई क्रीडा स्पर्धासारखी अत्यंत प्रतिष्ठेची स्पर्धा जोशात व उत्साहात तसेच नीटनेटकपणाने आयोजित करणे अपेक्षित असते. मात्र इन्चॉनमध्ये चालू असलेल्या स्पर्धेबाबत खूपच उदासीनता व अनास्था दिसून येत आहे. त्याचा फटका परदेशी खेळाडूंबरोबरच स्पर्धेचा वृत्तांत करण्यासाठी आलेल्या देशोदेशींच्या पत्रकारांनाही बसत आहे.
दक्षिण कोरियाने सेऊल येथे आशियाई क्रीडा स्पर्धेबरोबरच ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसारखा सर्वोच्च प्रतिष्ठेचा क्रीडा सोहळाही अतिशय थाटामाटात आयोजित केला होता. साहजिकच यंदाच्या आशियाई स्पर्धेबाबत आशियाई देशांमधील खेळाडू व अन्य पदाधिकाऱ्यांना खूप मोठय़ा अपेक्षा होत्या. इन्चॉन हे शहर सेऊलजवळच असल्यामुळे ही स्पर्धा आयोजित करताना कोरियन संयोजकांना कोणतीही अडचण येणार नाही अशी आशा होती. मात्र संयोजकांमध्ये किती उदासीनता व अनास्था आहे याचा प्रत्यय उद्घाटन सोहळ्यापासूनच येत आहे.
सर्वसाधारणपणे आशियाई किंवा ऑलिम्पिक स्पर्धेसारख्या मोठय़ा स्पर्धेबाबत अतिशय नियोजनपूर्वक प्रसिद्धी केली जात असते. त्याचा डांगोरा पिटविला जातो. मात्र इन्चॉनची स्पर्धा त्याबाबत खूप मागे पडली आहे, असे वारंवार दिसून येत आहे. उद्घाटन व समारोप सोहळ्यासाठी प्रेक्षकांकरिता जागा अपुरी पडते असे चित्र यापूर्वी झालेल्या आशियाई स्पर्धाचे वेळी दिसून आले आहे. तथापि, या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याचे वेळी स्टेडियमवरील भरपूर खुच्र्या रिकाम्या होत्या. या समारंभाचे थेट प्रक्षेपण पाहणाऱ्या कोटय़वधी प्रेक्षकांच्या नजरेतून ही गोष्ट सुटलेली नाही. या समारंभाकरिता ठेवण्यात आलेली तिकिटे खूप महागडी होती अशी तक्रार अनेक क्रीडा चाहत्यांकडून ऐकायला मिळत होती.
स्पर्धेतील विविध खेळांपैकी तीन-चार क्रीडा प्रकारांचा अपवाद वगळता अन्य खेळांच्या स्पर्धाना प्रेक्षकांचा प्रतिसाद अत्यंत अल्प आहे. अनेक ठिकाणी केवळ १८ ते २० टक्के स्टेडियम भरलेले आहे. सहसा अशा मोठय़ा स्पर्धाकरिता तिकिटे घेण्यासाठी चाहत्यांच्या खूप रांगा दिसून येतात किंवा इंटरनेटवर भरपूर तिकिटांचे आरक्षण केले जात असते. मात्र येथे अशा रांगांचा अभाव आहे आणि इंटरनेटद्वाराही फारशी तिकिटे आरक्षित करण्यात आलेली नाही. अशा स्पर्धाद्वारे नवनवीन खेळाडू घडावेत या अपेक्षेनेच संयोजक मोठय़ा प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक करीत असतात. या स्पर्धाना प्रेक्षकांचा प्रतिसाद अल्प असेल, तर निदान शालेय खेळाडूंना या स्पर्धा पाहण्याची संधी दिली असती व आपोआपच स्टेडियमवर भरपूर गर्दी दिसली असती. मात्र असे करण्यासाठी मोठी इच्छाशक्ती आवश्यक असते.
आशियाई खंडातील सर्वातच प्रतिष्ठेची ही स्पर्धा असली, तरी खेळाडू व पत्रकारांकरिता देण्यात आलेल्या सुविधा अतिशय नित्कृष्ट दर्जाच्या आहेत. तिरंदाजी स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंना व स्पर्धेसाठी उपस्थित असलेल्या पत्रकारांना दिलेले खाद्यपदार्थ तारीख उलटलेले असल्यामुळे अनेकांच्या तब्येतीवर अनिष्ट परिणाम झाला. खूप जण आजारी पडले. ही गोष्ट कोरियन तिरंदाजी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना लक्षात आल्यानंतर संघटनेने स्वत:हून पुढाकार घेऊन खेळाडूंसह सर्व संबंधितांना चांगले भोजन मिळेल अशी व्यवस्था केली. तिरंदाजी स्पर्धेसाठी असलेल्या पत्रकारकक्षात मोठय़ा टीव्ही स्क्रीनची व्यवस्थाच करण्यात आली नव्हती. तेथे अनेक सुविधांचा अभाव होता. त्याबाबत तक्रार केल्यानंतर तिरंदाजी संघटनेने अहोरात्र कष्ट घेत प्रसारमाध्यमांना किमान आवश्यक सुविधा मिळतील, अशी व्यवस्था केली.
व्हॉलीबॉल, बास्केटबॉल आदी सांघिक खेळांमध्ये सहभागी झालेल्या परदेशी संघांना विविध ठिकाणी सरावाच्या सुविधा दिल्या जाणार होत्या. मात्र एकाच वेळी एकच मैदान दोन ते तीन देशांना देत संयोजकांनी गोंधळात आणखीनच भर घातली. भारतीय संघाला त्याचा फटका बसला आहे. ऑलिम्पिक स्पर्धेसारखी सर्वोच्च आव्हानात्मक स्पर्धा यशस्वीरीत्या आयोजित करणाऱ्या कोरियन संघटकांकडून अशा मूलभूत चुकांची अपेक्षा नव्हती. ठेच लागल्यानंतर ते आता शहाणे झाले आहेत. उर्वरित स्पर्धेत ते याचे भान राखतील, अशी अपेक्षा करूया!
अनास्था आणि उदासीनता !
आशियाई क्रीडा स्पर्धासारखी अत्यंत प्रतिष्ठेची स्पर्धा जोशात व उत्साहात तसेच नीटनेटकपणाने आयोजित करणे अपेक्षित असते.
First published on: 25-09-2014 at 02:17 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No enthusiasm in orgnising asian games