Indian Flag Missing in Champions Trophy Controversy: चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारत खेळणार की नाही? यावर राजकीय स्तरावर बरीच चर्चा पाहायला मिळाली. पाकिस्तानमध्ये भारतीय संघ क्रिकेट खेळण्यासाठी जाणार नाही, अशी ठाम भूमिका भारत सरकारनं घेतली होती. त्यावर आधी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड व पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनीही टीका-टिप्पणी केली होती. त्यावरून बराच खल झाल्यानंतर अखेर चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील टीम इंडियाचे सामने दुबईला हलवण्यात आले, एवढंच नव्हे, तर भारत जर सेमीफायनल किंवा फायनलमध्ये पोहोचला, तर हे सामनेदेखील पाकिस्तानऐवजी दुबईमध्ये खेळवले जाणार आहेत. पण एकीकडे सुरक्षेच्या कारणावरून भारतानं ही भूमिका घेतली असताना दुसरीकडे आता पाकिस्तानच्या एका कृतीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.

नेमका काय आहे वादाचा मुद्दा?

गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाकिस्तानच्या कराची स्टेडियमवरचा असल्याचं सांगितलं जात आहे. शिवाय, चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी हे मैदान तयार करण्यात आल्यानंतरचा हा व्हिडीओ असल्याचंही सांगितलं जात आहे. नियमानुसार, स्पर्धेत जे संघ खेळणार असतील, त्या सर्व संघांचे ध्वज स्टेडियमवर लावले जातात. पण कराची स्टेडियमवर चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणाऱ्या इतर सर्व संघांचे ध्वज लावण्यात आले असले, तरी भारताचा तिरंगा या देशांच्या रांगेत दिसत नाहीये.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (PCB) या वृत्तीवर टीका केली जात आहे. सोशल मीडियावर पाकिस्तानला लक्ष्य केलं जात आहे. या स्टेडियमवर भारताचा तिरंगा का लावला नाही? असा प्रश्न पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला केला जात आहे. यासंदर्भात आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भातलं सविस्तर वृत्त दिलं आहे.

का लावला नाही तिरंगा?

सूत्रांच्या हवाल्याने इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं यासाठी आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियमाचं कारण दिलं आहे. “आयसीसीनं सामना असलेल्या मैदानावर फक्त चारच ध्वज लावण्याचा सल्ला दिला आहे. खुद्द आयसीसीचा (स्पर्धेचे आयोजक), पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा (स्पर्धेचे यजमान) आणि ज्या दोन देशांमध्ये सामना होत आहे, त्या दोन देशांचे ध्वज लावावेत असं सांगितलं गेलं आहे”, अशी माहिती पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या प्रवक्त्याने माध्यमांना नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे.

दरम्यान, दुसरीकडे IANS वृत्तसंस्थेनं याबाबत PCB च्या पदाधिकाऱ्याच्या हवाल्याने दिलेल्या वृत्ताचा उल्लेख इंडियन एक्स्प्रेसनं केला आहे. “तुम्हाला माहिती आहे की भारत चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचे त्यांचे सामने खेळण्यासाठी पाकिस्तानमध्ये येत नाहीये. त्यामुळे नॅशनल स्टेडियम कराची, रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम आणि गडाफी स्टेडियम लाहोर यांनी त्या ठिकाणी स्पर्धेदरम्यान खेळणाऱ्या देशांचे ध्वज लावले आहेत”, असं या पदाधिकाऱ्याने सांगितलं.

आठ वर्षांनी पुन्हा चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार

तब्बल आठ वर्षांनी पुन्हा एकदा चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार रंगणार आहे. १८ फेब्रुवारी रोजी टीम इंडियाचा पहिला सामना बांगलादेशविरोधात असून रविवारी २३ फेब्रुवारी रोजी दुसरा सामना यजमान पाकिस्तानविरोधात आहे. या सामन्यासाठी पाकिस्तानचा संघ दुबईला येणार आहे. शेवटच्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पाकिस्तान विजयी ठरला होता. त्यामुळे १९९६ नंतर पहिल्यांदाच पाकिस्तानला एखादी आयसीसी स्पर्धा देशात भरवण्याची संधी मिळाली आहे.

Story img Loader