अश्विनी पोनप्पाचे मत

बॅडमिंटनमधील एकेरीत खेळणाऱ्यांना जेवढे मानसन्मान मिळतात, तसे सन्मान दुहेरीतील खेळाडूंना मिळत नाहीत;.  त्यांना सापत्न वागणूकच मिळत असते, असे भारताची आंतरराष्ट्रीय खेळाडू अश्विनी पोनप्पाने सांगितले.

अश्विनीने २०११ मध्ये जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील महिलांच्या दुहेरीत ज्वाला गट्टाच्या साथीत कांस्यपदक मिळविले होते. ती म्हणाली, ‘‘आपल्या देशात दुहेरीच्या सामन्यांना फारसे कोणी महत्त्व देत नाही. युवा खेळाडूंनी जर दुहेरीत कारकीर्द घडवण्याचे ठरवले, तर त्यांना कोणाकडूनही प्रोत्साहन मिळत नाही. दुहेरीत कितीही अव्वल यश मिळविले, तरीही त्यांच्या कामगिरीची फारशी कोणाकडून दखल घेतली जात नाही. प्रायोजकांकडूनही एकेरीतील खेळाडूंनाच प्राधान्य दिले जात असते.’’

‘‘चीन, जपान, कोरिया आदी देशांच्या कमीत कमी पाच जोडय़ा आंतरराष्ट्रीय स्तरावर चमक दाखवत असतात. दुर्दैवाने आपल्या देशाच्या फारच कमी जोडय़ा आंतरराष्ट्रीय स्तरावर चमक दाखवतात. परदेशात दुहेरीतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना भरपूर प्रसिद्धी व प्रायोजक मिळत असतात. ज्वालाने व्ही. दिजू याच्या साथीत सुपरसीरिज मालिकांच्या अंतिम स्पर्धेत उपविजेतेपद मिळविले होते. मात्र त्यांचे कौतुक झाले नाही,’’ असेही अश्विनीने सांगितले.

Story img Loader