भेदक आणि आखूड टप्प्याचा मारा करत भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माने इंग्लंडच्या फलंदाजांना नतमस्तक व्हायला लावत भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. पण या देदीप्यमान यशानंतरही संघसहकारी सोडल्यास कुणीही माझे कौतुक केले नाही, अशा शब्दांत आपल्या मनातील शल्य इशांतने एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये व्यक्त केले.
‘‘काही वेळा मला असे वाटते की, माझ्याकडून झालेल्या चांगल्या कामगिरीचे संघसहकारी सोडल्यास कुणाकडूनही कौतुक केले जात नाही आणि या विजयानंतरही मला तसाच कटू अनुभव आला. मी सातत्याने जुन्या झालेल्या चेंडूने बाऊन्सर टाकत होतो आणि मला बळी मिळत गेले. पण ही दमदार कामगिरी करूनही कौतुकाची थाप पाठीवर पडत नाही. आता या सर्व प्रकरांना मी सरावलो आहे. त्यामुळे आता माझ्यावर या साऱ्या प्रकारांचा काहीही परिणाम होत नाही,’’ असे इशांतने सांगितले.
लॉर्ड्सवर खेळण्याच्या अनुभवाबद्दल विचारल्यावर इशांत म्हणाला की, ‘‘गेल्या वेळी लॉर्ड्सवर पहिल्या सत्रामध्ये चांगली गोलंदाजी करूनही मला बळी मिळाले नव्हते. पण त्यानंतरच्या सत्रात मला चार बळी मिळाले. लॉर्ड्सवर एकदा बळी मिळत गेले तर त्यांची संख्या वाढत जाते. प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांनी मला सतत बाऊन्सर टाकण्याची सूचना केली होती आणि या सूचनेचा चांगलाच फायदा झाला.’’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा