यावर्षीच्या आयपीएलमध्ये विराट कोहली आणि अफगाणीस्तानचा गोलंदाज नवीन उल हक यांच्यामध्ये भरमैदानात भांडण झाले होते. सामना संपल्यानंतर खेळाडू एकमेकांना भेट असताना गौतम गंभीरने या प्रकरणावरून विराट कोहलीशी वाद घातला होता. त्यानंतर एकदिवसीय विश्वचषकात नवीन उल हकने विराटशी झालेल्या वादावर पडदा टाकून त्याच्याशी हस्तांदोलन केले. दोघांच्या वादावर पडदा पडला तरी गौतम गंभीरने मात्र या प्रकरणावरू पहिल्यांदाच जाहीर प्रतिक्रिया दिली आहे. गौतम गंभीरने एएनआय वृत्तसंस्थेला सविस्तर मुलाखत दिली असून त्याने या मुलाखतीमध्ये अनेक विषयांवर आपली रोखठोक मते मांडली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माझ्या खेळाडूंचे रक्षण करणे माझे काम

लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या दरम्यान झालेल्या सामन्यात कोहली आणि नवीन उल हक एकमेकांना भिडले होते. या सामन्यात गंभीरने कोहलीशी आक्रमकपणे वाद घातला होता. एएनआयने या वादाबाबतचा प्रश्न गौतम गंभीरला विचारला असता तो म्हणाला, “सामना सुरू असताना मैदानात काय होते, त्याच्यात पडण्याचा माझा अधिकार नाही. पण सामना संपल्यानंतरही जर कुणी माझ्या खेळाडूंबाबत बोलत असेल त्यांच्याशी वाद घालत असेल तर मला त्या वादात पडून माझ्या खेळाडूंना संरक्षण देण्याचा पूर्ण अधिकार आहे.”

गौतम गंभीर पुढे म्हणाला, संघाचा मेन्टॉर असल्यामुळे प्रत्येक खेळाडूचे रक्षण करणे माझी जबाबदारी आहे. जर इतर संघाचे खेळाडू माझ्या खेळाडूंशी चुकीचा व्यवहार करत असतील तर ते मी पाहू शकत नाही. सामन्यानंतरही जर वाद सुरू राहिला तर त्यात मला पडावे लागेल आणि तेच मी केले.

खासदार असलेला गौतम गंभीर वादात पडण्याची ही पहिलीच वेळ नाही. सध्या लिजंड्स लिगमध्येही त्याचे आणि श्रीसंतचे वाद सुरू आहेत. याआधीही गौतम गंभीरने अनेक खेळाडूंशी पंगा घेतलेला आहे. नवीन उल हकची बाजू घेत असताना गंभीर लखनऊ सुपर जायंट्स संघाचा मेन्टॉर होता. आता तो पुन्हा एकदा केकेआर संघाशी जोडला गेला आहे. पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएलमध्ये तो केकेआरसह दिसेल. गौतम गंभीरने २०१२ आणि २०१४ साली केकेआरला आयपीएलचा चषक जिंकून दिला होता.

हे वाचा >> LLC 2023 : गौतम गंभीरच्या पोस्टवर श्रीसंत संतापला; म्हणाला, ‘तू सर्वोच्च न्यायालयापेक्षा…’

गौतम गंभीर वि. श्रीसंत ताजा वाद

लिजेंड्स लीग क्रिकेट २०२३ (एलएलसी २०२३) स्पर्धेत निवृत्त झालेले खेळाडू सहभागी झालेले आहेत. गौतम गंभीर आणि गोलंदाज श्रीसंत यांच्यात ६ डिसेंबर रोजी मैदानावर जोरदार वादावादी झाली. श्रीसंतने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून गौतम गंभीरवर निशाणा साधला होता. मात्र या व्हिडिओमुळे श्रीसंतच्या अडचणी वाढल्या. लिजेंड्स लीग क्रिकेट (एलएलसी) च्या आयुक्तांनी श्रीसंतला कायदेशीर नोटीस बजावली आहे. टी-२० स्पर्धेत खेळताना श्रीसंतने त्याच्या कराराचे उल्लंघन केल्याचे नोटिसीत नमूद करण्यात आले आहे. श्रीसंतने गौतम गंभीरवर टीका करणारे व्हिडीओ काढून टाकले, तरच त्याच्याशी चर्चा सुरू केली जाईल, निवेदन जारी करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No one can come and walk over my players gautam gambhir defends his actions in ipl 2023 spat between virat kohli and naveen kvg
Show comments